सरपंचपदाच्या शपथविधीसाठी हेलिकॉप्टरमधून धडाकेबाज एन्ट्री

    संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा सोहळा झाला. पुण्यात उद्योजक असलेले जालिंदर गागरे या गावाचे सरंपच झाले आहेत. त्यांनी दुपारी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश केला. त्यानंतर बारा बैलांच्या गाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. नव्या सरपंचाचे आणि सदस्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. या गावातील उद्योजक जालींदर गागरे यांच्या पुणे येथे अनेक कंपन्या आहेत. ते पुण्यातच राहतात. मात्र, गावाशी त्यांचा संपर्क असतो. अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावात विविध कामेही त्यांनी केली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांचे त्यांशी चांगले संबंध आहे.

    सनई चौघडे, ढोल ताशा, भगवे फेटे आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद तो म्हणजे गावात हेलिकॉप्टर येणार. पण हेलिकॉप्टरमधून कुठला मंत्री, नेता येणार नसून चक्क गावचा सरपंच मोठ्या थाटात येणार असल्याने हे दृश्य पाहण्यासाठी गावातीलचं नव्हे तर गावाशेजारील मंडळींनी हजेरी लावली होती.

   एखाद्या मंत्र्याच्या शपथविधी सोहळ्यालाही लाजवेल असा शपथविधी सोहळा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालूक्यातील आंबी दुमला गावात पाहायला मिळाला. सरपंचाचे हेलिकॉप्टरने थाटात आगमन होताच बारा बैलजोडीच्या बैलगाडीत त्यांची संपुर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली.

   गावातील तरूण जालींदर गागरे कामानिमित्त पुण्यात आले आणि तिथेच स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी कंपन्या उभ्या केल्या. पण त्यांचे गावाबरोबर संबंध तुटले नव्हते. गावातील अनेक सामाजिक कार्यांमध्ये ते पुढाकार घेत. गावातील तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले होते. गावाच्या विकासासाठी त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत उभं राहायचं ठरवलं आणि गावातील लोकांनीही त्यांना साथ देत विजयी केलं. गावचे सरपंचपदही सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने त्यांच्याचं गळ्यात सरपंच पदाची माळ पडली.

   महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला, असे आवाहन केले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन मी गावात लक्ष घालून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सोहळा कायमचा लक्षात राहावा त्यासाठी हेलिकॉप्टर आणि भव्य कार्यक्रम आयोजित केला. सोबत आम्ही जी शपथ घेतली तीही महत्वाची आहे.

              जालिंदर गागरे, सरपंच, आंबी दुमाला

error: Content is protected !!