इचलकरंजी/प्रतिनिधी
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कोरोना संकटात आवश्यक ते उपचार उपलब्ध असून काही तांत्रिक अडचणी असतील . त्या पालकमंत्री म्हणून निश्चितपणे दूर करण्याचा प्रयत्न करु. तर शहरातील खाजगी दवाखाने उघडले गेले नाही तर सोमवारी पहिल्यांदा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर माहिती देताना ते म्हणाले, शहर आणि परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. अशावेळी डीपीडीसीच्या माध्यमातून तसेच शासनाकडून निधी देऊन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात रुग्णालय प्रशासनाकडून चांगली सेवा दिली जात आहे. काही तांत्रिक अडचणी असतील. पण पालकमंत्री म्हणून त्या अडचणी निश्चितपणे सोडवीन. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 70 ते 80 टक्के व्यक्ती या मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, न्युमोनिया अशा आजारांनी ग्रस्त होते. त्यांनी वेळेत उपचार न घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अशा रुग्णांची यादी तातडीने प्रशासनाला उपलब्ध करुन द्यावी. तसेच त्या त्या डॉक्टरांनी संबंधित रुग्णांशी संपर्क ठेवून त्यांना लक्षणे आढळल्यास, त्रास जाणवत असल्यास त्यांच्यावर तातडीने योग्य ते उपचार केल्यास धोका टळू शकतो या संदर्भात सुचना दिल्या आहेत. शहरातील काही लॉज कोविड सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात येणार असून त्याची जबाबदारी ही स्थानिक डॉक्टर किंवा हॉस्पिटल यांच्यावर सोपविली जाईल, अशा पध्दतीचे नियोजन केले जात आहे. दहा स्टाफ नर्सेस तसेच आवश्यक व्हेंटीलेटरही इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास देण्यात येणार आहेत.
लॉकडाऊन सुरु राहिल किंवा उठेल हे उद्या जाहीर होईल. परंतु नागरिकांनी संंयम बाळगून स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्यावी. मास्क हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असे समजूनच काही महिने वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे एखाद्याला लक्षणे आढळून आल्यास तातडीने उपचार घ्यावेत. आपण आपली काळजी घेतली तर निश्चितपणे कोरोनावर मात करु . असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, नगरसेवक शशांक बावचकर, संजय कांबळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.