कोरोना पूर्णपणे बरा होतो – जिल्हाधिकारी ;केटरिंग कॉलेज कोविड केअर सेंटरची केली पाहणी

सोलापूर [ता:२६]/ प्रमोद गोसावी

         कोरोना विषाणूची बाधा झाली . तरीही योग्य आणि वेळेत उपचार घेतल्यास पूर्णपणे बरे होता येते. उपचारातील नाविन्यपूर्ण उपक्रमाने रुग्णांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी मदत होत आहे. यामुळे रुग्ण लवकर बरे होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केला.
             सोलापुरातील संभाजी तलावाच्या मागील बाजूला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्र इंन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नालॉजी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरची श्री. शंभरकर यांनी पाहणी केली. त्यांनी रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, प्रांताधिकारी ज्योती पाटील उपस्थित होते. कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी उपचाराशिवाय योगासने, प्राणायाम, संगीत, समुपदेशन, असे उपक्रम राबविण्यात येत आहेत, हे कौतुकास्पद आहे. यामुळे रुग्णांमधील भीती कमी होऊन रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्ये सोयी-सुविधा सुरू करण्याचे निर्देश श्री शंभरकर यांनी संबंधितांना दिले.
           सेंटरमध्ये मराठी भाषेतील भजन , भावगीतांचे तसेच कन्नड गाणी सुरू करण्याचा उपक्रमही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांनी घरी गेल्यानंतर कुटुंबाची व स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच रुग्णांचे जास्तीत जास्त समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या.
          आयुक्त शिवशंकर म्हणाले, लॉकडाऊन काळात लोकप्रतिनिधी, नागरिकांचे सहकार्य मिळाले. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये सुद्धा योगा, प्राणायाम, संगीत, एफएम याचे नियोजन करण्यात येणार आहे. सेंटरमधील ३४४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिलेल्यामध्ये एका ८५ वर्षीय आजींचा समावेश आहे. इथल्या सुविधा आणि डॉक्टर व इतरांनी दिलेल्या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे एका महिलेला आनंदाश्रू अनावर झाले. बोलताना त्यांचा कंठ दाटून आला.
           तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी राहुल देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण खारे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!