तारदाळमधील युवकाचा खून

खोतवाडी तालूका हातकणंगले येथे अनैतिक संबंधातून तारदाळमधील युवकाचा धारदार शास्त्रांनी पंचवीस वार करून व डोक्यात दगड घालून निघृण खून करण्यात आला. मयूर दीपक कांबळे (वय २५, रा. जावाईवाडी, तारदाळ) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. दरम्यान, रात्री उशिरा अंकुश व रेहान या दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. संशयित मारेकरी विनायक संभाजी चौगुले हा रावण गँगचा म्होरक्या असून, तो जखमी असल्याचे समजते. त्याच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
विनायक चौगुले व मयूर कांबळे यांच्यामध्ये अनैतिक संबंधातून पूर्वी वाद झाला होता. यामुळे मयूरचा काटा काढायचा या उद्देशाने विनायक व त्याच्या साथीदारांनी फिल्डिंग लावली होती. सांगली नाक्याजवळील यड्राव हद्दीतील एका बीअरबारमध्ये चौघेजण दारू पिण्यासाठी बसले होते. तेथे वाद वाढू लागल्यामुळे तेथून चौघेही तारदाळच्या दिशेने आले व खोतवाडी हद्दीतील आरोही बारसमोर थांबले. यावेळी पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी विनायक व त्याच्या साथीदारांनी मयूरवर हल्ला केला. यामध्ये तो जखमी होऊन जीवाच्या आकांताने पळत सुटला. सुमारे ३०० मीटर अंतरावर हल्लेखोरांनी त्याला गाठले व त्याच्यावर तलवारीसारख्या धारदार हत्यारांनी सपासप वार केले. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयूरला आयजीएम रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, शहापूरचे निरीक्षक विकास भुजबळ यांनी पाहणी करून पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!