३६ हजारांची लाच घेताना महावितरणचे आधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात …

लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा – सरदार नाळे

हातकणंगले / प्रतिनिधी
    अनाधिकृत वीज वापर केलेल्या ग्राहकाकडून दंडाची रक्कम कमी करण्यासाठी छत्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना इचलकरंजी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहाय्यक लेखापाल या दोघांवर कोल्हापूर लाचलुचपत विभागाने कारवाई केली .
सुयोग दिनकर पाटणकर (वय – ४७ वर्ष , रा. खासबाग मैदान जवळ , मंगळवार पेठ , कोल्हापूर . मूळ रा. सोमवार पेठ पन्हाळा , ता . पन्हाळा जि. कोल्हापूर ) व रवींद्र बापूसो बिरनाळे (वय – ३८ वर्ष , रा. आमराई रोड , शिक्षक कॉलनी , इचलकरंजी ) अशी संशयित लाचखोर आरोपींची नावे आहेत .

   याबाबत अधिक माहिती अशी की , इचलकरंजी येथील तक्रारदार यांनी स्वमालकीच्या इमारतीमध्ये व्यवसायासाठी औद्योगिक लाईट जोडणी परवाना घेतला होता . परंतु व्यवसाय बंद झाले नंतर तक्रारदार यांनी सदरची जागा औद्योगिक परवाना लाईट सह कराराने भाड्याने दिली . सप्टेंबर २०२३ मध्ये औद्योगिक परवाना असलेल्या लाईटची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर कलम १२६ प्रमाणे एक लाख बावीस हजार सहाशे अष्ठ्याहत्तर रुपये दंड झालेची नोटीस दिली . त्यानंतर तक्रारदार यांची महावितरणच्या कार्यालयामध्ये सुनावणी झाली . सुनावणीनंतर कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग दिनकर पाटणकर व सहाय्यक लेखापाल रवींद्र बापूसो बिरनाळे यांनी तक्रारदार यांना झालेला दंड कमी करून अंदाजे एकोणीस हजार रुपये केला . असे सांगून एकेचाळीस हजार रुपये आम्हा दोघांसाठी द्यावे लागतील . असे एकूण साठ हजार रुपयांची मागणी केली .
     त्यानंतर तडजोडी अंती तक्रारदार यांनी पच्चावन्न हजार रुपयांची रक्कम देणेचे ठरले . तक्रारदार यांनी कोल्हापूर येथील लाच लुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दिल्यानंतर दंडाचे एकोणीस हजार रुपये वगळता छत्तीस हजार रुपयांची दोघांसाठी लाच देण्याचे ठरले . सदरची रक्कम अभियंता पाटणकर यांचे साठी स्वीकारताना सहाय्यक लेखापाल बिरनाळे यांना रंगेहात पकडण्यात आले .
    ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे , पोहेकॉ विकास माने , रुपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव यांनी केली.
तसेच लाचलुचपत विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. तसेच तक्रार दिल्यानंतर फिर्यादीचे कोणतेही शासकीय काम थांबणार नाही. असे आवाहन लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे.
यांनी केले असुन 9673506555 मो.नं. वरती व या कार्यालयीन क्रमांकावर 0231- 2540989 संपर्क साधण्यासाठी मेल आयडी dyspacbkolapur@gmail.com यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता. व
टोल फ्रि क्रं. 1064 असल्याचे कळविण्यात आले असुन दिलेल्या तक्रारीबाबत आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे .

error: Content is protected !!