लंम्पी बाधीत उपचारासाठी जिल्ह्याला एक कोटी निधी – मंत्री विखे-पाटील ;वडगाव, अतिग्रे, हेरले गावातील गोठ्यांची पहाणी …

हातकणंगले / प्रतिनिधी :
शेतकऱ्यांचे पशूधन वाचावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे . लंम्पी बाधीत जनावरांच्या उपचाराच्या खर्चाचा भार शेतकऱ्यांवर पडू नये , याकरिता कोल्हापूर जिल्ह्याला एक कोटी रूपयांचा निधी दिला आहे. अशी माहीती राज्याचे पशू संवर्धन व महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज हातकणंगले येथील तहसिल कार्यालयात आढावा बैठकीत दिली. दरम्यान मंत्री विखे -पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील वडगाव, अतिग्रे, हेरले या गावातील जनावरांच्या गोठ्यांची पहाणी केली .


हातकणंगले येथील आढावा बैठकीत बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खास . धैर्यशिल माने, आम . प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, राहुल रेखावार, संजयसिंह चव्हाण, अशोक माने, व अन्य मान्यवर …


राज्यामध्ये प्रार्दुर्भाव झालेल्या ३० जिल्ह्यात रोग नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला यश आले असून खबरदारी म्हणून पशू आंतरराज्य प्रवास बंदी, बाजार बंदी, पशूधन वाहतूक बंदी केल्याने लंम्पी रोग आटोक्यात असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
बैठकीत खास . धैर्यशील माने यांनी तालुक्यात पशूवैद्यकांची कमतरता असल्याने जनावरांची हेळसांड होत असल्याचे सांगितले . तर
आम . राजूबाबा आवळे यांनी तालुका मोठा असल्याने खाजगी डॉक्टरांना काम करण्याची परवानगी मिळण्याची मागणी केली .
आम . प्रकाश आवाडे म्हणाले , साखर कारखाने काही दिवसात सुरु होणार असल्याने परजिल्ह्यातून ऊस वाहतूकीसाठी येणाऱ्या जनावरांना तेथेच लसीकरण करूनच पाठवावीत अन्यतः मोठ्या प्रमाणात लंम्पीचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावेळी माजी आम . राजीव आवळे , जि.प . सदस्य अरुणराव इंगवले यांनी उपाययोजना सुचविल्या .
आढावा बैठकीस जिल्हाधिकारी राहूल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार कल्पना ढवळे, शिरोळचे जि.प सदस्य अशोक माने, प्रसाद खोबरे, वैभव कांबळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्यासह मोठया संख्येने लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

अतिग्रे गावात एकाच सुईने अनेक जनावरांना लसी टोचण्यात आल्याने लंम्पी रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालाआहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश यावेळी मंत्री पाटील यांनी दिले.
error: Content is protected !!