सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजीत शांतता बैठकीत इचलकरंजीतील वाढत्या गुन्हेगारीचीच चर्चा अधिक

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सुरुवातीपासून सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच इचलकरंजीतील वाढत्या गुन्हेगारीवर बोट ठेवले. त्यामुळे ही बैठक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर असली तरी चर्चा शहरातील गुन्हेगारीवर झाली.
‘शहरात औद्योगिक शांतता बिघडली असून ती जपण्यासाठी पोलिसांचे पाठबळ कमी पडत आहे. वाढलेल्या गुंडगिरीबाबत विधानसभेत आवाज उठवला आहे. गुंडांच्या याद्याही दिल्या आहेत. त्या मिळाल्या नसल्या तर पुन्हा पुन्हा याद्या देतो. पोलिस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांना नीट वागणूक मिळत नाही. मात्र, गुंडांना सौजन्याने खुर्ची मिळते, ’ अशी घणाघाती टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासमोरच केली.आमदार आवाडे (MLA Prakash Awade) म्हणाले, ‘कोल्हापुरातील पोलिसांकडून इचलकरंजी शहरात येऊन सातत्याने कारवाई केली जाते. एकाच क्लबवर तीन तीन वेळा कारवाई होते. मात्र स्थानिक पोलिस शांतच आहेत. शहराच्यादृष्टीने ही मोठी खंत आहे. यामुळे शहरात गुंडगिरी वाढत असून शहर शांत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आता पोलिसांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. सर्वसामान्य नागरिकांना काही त्रास होत असेल तर तक्रार करा. तक्रार कोणी घेत नसतील तर माझ्याकडे या. मी कोणाला सोडणार नाही.’
यानंतर गुन्हेगारीच्या सर्व मुद्द्यांना दुजोरा देत बोलताना पोलिस अधीक्षक पंडित म्हणाले,‘गांजा, चरसचे प्रमाण वाढले आहे. याची साखळी तोडून काढण्यासाठी पोलिस दलाला सूचना दिल्या आहेत. शहरातील गुंडांवर तीन तीनवेळा मोका कारवाई करूनही ते गंभीर गुन्हे करत आहेत. यापुढे शास्त्रोक्त तपास करून अशा समाजकंटकांची जागा कायमस्वरूपी जेलमध्येच ठेवली जाईल.’

बैठकीसाठी प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले, पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप ठेंगल, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सत्यवान हाके, साहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील, पोलीस निरीक्षक राजु ताशीलदार, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, पै.अमृत भोसले, भरत जोशी, अभय बागेल, शहाजी भोसले, सलीम अत्तार, नितीन कटके, रवी गोंदकर, पंढरीनाथ ठाणेकर, विकास चौगुले, संतोष कांदेकर, भरत जोशी यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी, संघटना, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!