कोल्हापूरकरांना सुविधा देण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देणार-पालकमंत्री हसन मुश्रीफ

रेल्वे फाटक शाहूपूरी पाच बंगला परिसरातील पादचारी उड्डाणपुलाचे भूमिपूजन

कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेचे विविध प्रश्न मार्गी लावून नागरिकांना रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी व इतर सुविधा देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक तो निधी मिळवून देवू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून (जिल्हास्तर) रेल्वे फाटक शाहूपुरी पाच बंगला परिसरात 3 कोटी 88 लाखाचा पादचारी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पादचारी उड्डाणपूलाच्या कामाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नागरीकांना मुख्य एसटी स्टॅण्डकडे राजारामपूरीकडून जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. यासाठी रेल्वेने बंदीस्त तटबंदी घातल्याने नागरीकांना फिरुन जावे लागत होते. यावेळी त्यांना जीव मुठीत घेवून परिख पुलाखालून जावे लागत असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत होती. अनेक दिवसापासून उड्डान पूलाची मागणी होती. मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) या निधीमधून 3 कोटी 88 लाखाचा निधी मंजूर करुन दिला. हा पूल पायऱ्या चढून जाण्याचा असून याठिकाणी नवीन अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सरकता जिना करता येईल का याबाबत शहर अभियंता यांनी सर्व्हे करुन घ्यावा. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ. यासाठी त्याचे अंदाजपत्रक तयार करा. आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ यासाठी निधी देऊ. महानगरपालिकेत बरेचशी कामे युध्दपातळीवर सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांचे कोल्हापूरवर विशेष लक्ष आहे. थेट पाईपलाईन योजना कार्यान्वीत होऊन त्याचा लोकार्पणही मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आला आहे. परंतू अजूनही शहरामध्ये बऱ्याचशा भागात स्वच्छ व मुबलक पाणी मिळत नाही. अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी यामध्ये लक्ष घालावे. यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असतील तर त्या अडचणी सोडवाव्यात. शहरामध्ये सर्व ठिकाणी हे पाणी सम प्रमाणात वाटण्यासाठी जे जे करावे लागेल ते करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या.

पाणी हे नागरीकांना मुबलक पोहोचलेच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे. 100 कोटींच्या रस्त्यांच्या कामाची वेळोवेळी माहिती घेत आहे. शहरामध्ये आणखीन रस्ते कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 100 कोटीची मागणी केलेली आहे, तीही लवकरच मंजूर होईल. अंबाबाई मंदीर विकासासाठी पूर्वी 10 कोटी मंजूर झाले आहेत. आत्ता पुरवणी बजेटला 40 कोटी मंजूर झाले आहेत. अंबाबाई मंदीर विकासासाठी 1200 कोटींचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. तितकाच जोतिबा विकास आराखडा तयार केला आहे. दोन्हीही आराखडे लोकसभा निवडणुकीनंतर मंजूर होतील आणि कोल्हापूरवासियांचे अनेक दिवसाचे स्वप्न साकार होइल. यामध्ये भक्तांना विविध सुविधा मिळतील, पर्यटनामध्ये वाढ होईल, रोजगार वाढेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी प्रास्ताविकात परिख पुलानजिक रेल्वेच्या एका भागाकडून दुस-या भागाकडे जाण्यासाठी भुमिगत मार्गाचा वापर न करता दररोज हजारो पादचारी जीव धोक्यात घालुन रेल्वे टर्मिनस जवळील रेल्वे मार्ग ओलांडून मार्गक्रमण करीत आहेत. ब-याच वेळा अशा प्रकारे मार्गक्रमण करताना अनेक पादचा-यांचा अपघात झालेला आहे, ही बाब विचारात घेऊन याठिकाणी पादचारी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पादचारी उड्डाणपुलाची एकुण लांबी ५२ मी. असुन रुंदी ३.६० मी. आहे. या पुलास ३ पिलरचे बांधकाम करावे लागणार असून या पुलाची उंची रेल्वे रुळापासुन सुमारे ६.५ मी. असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी पुरवठा विभागाच्या अनुकंपातत्वानुसार पात्र कर्मचाऱ्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडील अनुकंपातत्वानुसार पात्र 3 वारसांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते याठिकाणी नियुक्ती पत्रे देण्यात आली. यामध्ये मजूर म्हणून प्रथमेश मारुती चौगुले, रोहन प्रकाश तिवले, वैभव हिंदूराव मिरजे अशा 3 पदांवर वारसाने नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी नगरसेवक आदिल फरास, सत्यजित कदम, राजेश लाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वणकुदे यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, रमेश कांबळे, सतीश फप्पे, कनिष्ठ अभियंता अरुणकुमार गवळी, सुरेश पाटील, प्रज्ञा गायकवाड, माजी नगरसेवक संजय मोहिते व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!