भारताचे माजी राष्ट्रपती आदरणीय प्रणव मुखर्जी यांच परवा सोमवारी दुःखद निधन झालं. गेले पंधरा दिवस ते रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होते. वार्धक्य आणि त्याबरोबरच सध्याच्या कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल असतानाच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत, सहनशील व्यक्तीमत्व लोपले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

गेल्या पाच-सहा दशकांत अशा प्रकारे भारतीय राजकारणात कार्यरत राहून देशसेवा करणाऱ्या अनेक नेत्यांपैकी स्व. प्रणव मुखर्जी हे एक होत. काँग्रेस पक्ष आणि तिच्या प्रचलित संस्कृतीत कार्य करताना येणाऱ्या नेतृत्वगुणां विषयीच्या श्रेष्ठत्वाला दाबून ठेवत. प्रणवदां चिकाटीने कार्यरत राहून अगदी राष्ट्रपती पदापर्यंत पोचले, आणि पायउतार झाल्यावर देशाच्या सर्वोच्च अशा “भारतरत्न” या बहुमानाने गौरविले गेले.
व्यासंग आणि विद्वत्तेच्या बळावर,राजकीय व्यवहारातील अनेक प्रश्न सोडविताना परिस्थितीतील प्रतिकूलतेचा बाऊ कधीही न करता पक्षासाठी, देशासाठी कार्यरत राहिले.
कै.इंदिरा गांधीच्या हत्येनंतर,काँग्रेसपक्षाने अंतर्गत कुरघोडीचे राजकारण टाळून, प्रसंगी घराणेशाहीला प्राधान्य न देता,पंतप्रधानपदासाठी प्रणवदांना संधी देण्याचा गांभीर्याने विचार केला असता, तर कदाचित आज काँग्रेसपक्षाला सक्षम नेतृत्वाअभावी जे अस्तित्वासाठी लंगडे राजकारण करावे लागते आहे. त्या ऐवजी चांगले भवितव्य प्राप्त झाले असते.अर्थात या सर्व जर-तरच्या गोष्टी नियतीला थोड्याच अपेक्षित असतात.ती आपले फासे टाकीत असते . आणि रंगलेले डाव,ती
उधळतेहि.असो तो भाग आणि इतिहास जुना झाला.
आजही आपण पाहिले तेंव्हा, स्व.प्रणवदांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना वंदन करण्या बाबतही काँग्रेस पक्षांतर्गत म्हणावी. तेवढी उत्सुकता दिसून आलेली नाही . हे कशाचे द्योतक म्हणावे लागेल.
स्व.प्रणवदांना पाहिल्यानंतर त्यांचे अतिशय गंभीर आणि अभ्यासू असे व्यक्तिमत्व समोर येते,पण त्याबरोबरच, त्यांचे सर्वसामान्य कौटुंबिक जीवन ही किती लोभस आणि भावनिक ऐश्वर्याचे दर्शक होते . हे एके ठिकाणी लिहिलेल्या त्यांच्या पत्नी कै.सौ.सुवरा यांच्या लेखातून दिसून येते. त्यामध्ये त्या लिहितात प्रपंचाच्या प्रारंभीच्या काळात एकदा त्या उभयतां पती-पत्नीतीतील कसल्यातरी घरगुती वादानंतर सुवरा या तावातावाने घरातून बाहेर पडल्या आणि आपल्या माहेरी जाण्यासाठी त्यांनी रेल्वे स्टेशन गाठले,व त्या गाडीत जाऊन बसल्या. थोड्याच वेळात गाडी सुरू झाली. आणि मग त्यांच्या लक्षात आले की अरे! आपण प्रवासाचे तिकीटच काढले नाही, दरम्यान डब्यात आलेल्या टी.सी.ने त्यांच्याकडे येऊन तिकिटाची मागणी करताच.भेदरलेल्या, त्या अधिकच घाबरल्या.पण लगेचच पाठीमागून ‘ हे घ्या तिकीट ‘ म्हणून एक आवाज आला, आणि त्या आवाजाच्या दिशेने पाहिले तर दोन तिकिटे हातात घेऊन हसत हसत प्रणवदां उभे होते.” आपली पत्नी रागाच्याभरात घराबाहेर पडली आहे ,हे लक्षात येताच प्रणवदा त्यांच्या मागोमाग स्टेशन पर्यंत गेले,आणि दोन तिकिटे काढून पत्नी ज्या डब्यात चढली होती. ते त्या डब्यात नकळतपणे चढले….ही तर एखाद्या चित्रपटात दिसावी. अशी घटना पण भावनेला कुरवाळणारी,मनातील संवेदनशीलता जोपासणारी आठवण.भावनिक हिंदोळ्यावर झुलणाऱ्यांच्या मनांना सुखद करणारीच म्हणावी लागेल.अशा अनेक आठवणींच्या पाऊलवाटेवर चालता-चालता माणूस स्वतःच कधी त्या आठवणींच्या झरोक्यातुन डोकावतो हेच कळत नाही.
भारतीय राजकारणाची उच्चतम परंपरा जोपासणाऱ्या कठोर पण तेवढ्याच संवेदनशील प्रसन्न व्यक्तिमत्वाला विनम्र श्रद्धांजली .
सुर्यकांत देशपांडे नालासोपारा
( मो.नं.७४९८१५५१९८)