वस्त्रनगरीचं प्रेरणास्थळ जपायलाच हवं…!

            काही दिवसांपूर्वी पंचगंगेच्या नदी तीरावर गेलो होतो, खूप आनंद झाला. माझ्या वस्त्रनगरीचं वैभव असणारी आमची पंचगंगा नदी अगदी निखळ आणि आनंदाने वाहत होती. कारण जणू ती आता मुक्त झाली होती, असेच काहीसे म्हणावे लागेल… खूप वर्षातून तिने प्रदूषणातून मुक्त होत मोकळा श्वास घेतला होता… लॉकडाऊन सुरु झाल्यापासून प्रोसेस, सायझिंगच्या रासायनिक सांडपाण्याला कोठे तरी बंधने आली होती.

               त्या पाण्यामुळे गुदमरली जाणारी माझी पंचगंगा नदी इतकी निखळ वाहताना पाहिली.. जणू ती मला सांगत होती, अरे..! होय मला मोकळा श्वास मिळालाय…तीचं असं आनंददायी रूप मला जाणवलं…! आनंदीत झालेली जीवनदायिनी पाहिली, तीचं दर्शन घेतलं अन् पायरी चढत वर निघालो… वरच्या बाजूला महादेवाचं दर्शन घेतलं. आणि समोरच इचलकरंजी संस्थानचे अधिपती जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांची समाधी असलेल्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पावले वळू लागली. त्याठिकाणी दर्शन घेतलं आणि त्या समाधीजवळच एक धक्कादायक दृश्य पाहिलं..!

               त्या समाधीच्या वास्तूजवळ काही लोक चप्पल घेऊन झोपले होते. हे पाहून मनाला खूप वाईट वाटले. तसेच संबंधित लोकांच्या मानसिकतेचा खूप राग आला. कारण, अशी मानसिकता लोकांच्या मनात येते कोठून..? कारण थोर व्यक्तींच्या समाधीजवळ कोणीतरी चप्पल घेऊन झोपावं, याचा राग जणू अनावर झाला होता. कारणही तसंच होतं, श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे म्हणजे इचलकरंजीच्या इतिहासातील सुवर्णपान… ज्यांच्या नावाशिवाय इचलकरंजी या नावाचा इतिहास सुरूच होऊ शकत नाही, ज्यांच्या दूरदृष्टीतून इचलकरंजी गावामध्ये पहिला हातमाग आणला …आणि तेथूनच पुढे यंत्रमाग उद्योगाचा विस्तार होऊन या गावाला वस्त्रनगरी म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर देशात संबोधले जाऊ लागले, असे हे असामान्य व्यक्तीमत्व लाभलेले इचलकरंजी संस्थानचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार यांच्या समाधीजवळ इतकी वाईट अवस्था…? मग मी तेथील लोकांना उठवलं …तसं माझं वय कमी होतं, पण गावाला नवी ओळख देणाऱ्या घोरपडे सरकारांबद्दल खूप आत्मीयता होती. त्याच भावनेतून वय लहान असतानाही वयाने
मोठे असलेल्या लोकांना बोलू लागलो… पण त्यांनी मला जे सांगितलं , ते माझ्या मनाला पटलं नव्हेतर ती सत्य परिस्थितीच आहे. ते म्हणाले ,अहो..! आम्ही भटके लोक… आम्हाला माहीत नाही या वास्तूचं महत्व. इथे आसरा मिळाला म्हणून आम्ही ही झोपायला जागा निवडली.. आम्हाला माहिती असते . तर आम्ही इथे चप्पल घेऊन आलोच नसतो, नव्हे तर इथे एक फलक जरी त्यांच्या नावाचा लावला असता तर इतकं धाडस आम्ही केलं नसतं. आमच्याही मनात त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर आहे.पण या समाधीची कल्पनाच आम्हाला नव्हती.
               मग इथे खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आमच्या दुर्लक्ष झालेल्या कर्तव्याकडे… इचलकरंजीचे जहागीरदार आणि असामान्य व्यक्तीमत्वाची समाधी म्हणजे जणू ते शहराचं प्रेरणास्थळ आहे ,त्याची ही अवस्था…आज अनेक लोक आपल्या इचलकरंजीमध्ये येतात… मी नेहमी म्हणतो की, आपल्या इचलकरंजी गावाला स्वतःचा वेगळा इतिहास आहे… पण आता आपल्या गावच्या वैभवाकडे आपण दुर्लक्ष करत चाललो आहे…याचं भान आपल्याला यायला हवं. ज्यांच्यामुळे आपल्या गावाला नवी ओळख निर्माण झाली. त्यांची प्रचिती इथून पुढच्या काळात इचलकरंजीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक पिढीला व्हायला हवी …त्यासाठी आपण काय करतोय..?
 हा लेख लिहण्यामागे इतकाच प्रांजळ उद्देश होता…
             श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या समाधीची माहिती काही लोकांना अपरिचित आहे. त्याला कारण जशी नगरपरिषद आहे ,तसेच लोकप्रतिनिधी व माझ्यासहित सुज्ञ इचलकरंजीकरही आहेत..लवकरच या समाधीचं महत्व लोकांना कळावं , यासाठी जे काही करता येईल, ते आपल्या परीने नक्कीच करूया. मी माझ्या परीने घोरपडे सरकारांची ओळख व कार्य पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोच आहे. आता कर्तव्य म्हणून तुम्ही देखील प्रयत्न करावेत ,इतकीच माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे…!  

                शब्दांकन
प्रथमेश इंदुलकर
इचलकरंजी

error: Content is protected !!