दत्त जयंती सोहळ्याची नृसिंहवाडीत तयारी पूर्ण

       नृसिंहवाडी ता. शिरोळ येथील दत्त मंदिरात २६ तारखेला दत्त जन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी युद्धपातळीवर पूर्ण केली असून भाविकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य दिले आहे. ग्रामपंचायत, दत्त देवस्थान व पोलिस प्रशासन यांनी समन्वय ठेवून आहे. दत्त जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत, अशी माहिती दत्तराज आघाडीचे समन्वय समितीचे विकास पुजारी यांनी दिली.
     नृसिंहवाडी येथे ग्रामपंचायत व सत्ताधारी दत्तराज आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी पुजारी म्हणाले, येत्या २५ वर्षांसाठीचा बृहत विकास आराखडा करण्याचा संकल्प दत्तराज आघाडीने केला आहे. दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर लाखोच्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी पर्यायी मार्ग, अतिक्रमण निश्चिती, पार्किंग व्यवस्था या बाबींवर काम पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठ्याचे काम योग्यरीतीने सुरू असून त्या संदर्भात झालेले आरोप निव्वळ राजकीय पूर्वग्रहाने झाले आहेत. दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे म्हणाले, भाविकांच्या सोयीसाठी मुख्य दत्त मंदिरात विविध टप्प्याच्या दर्शन रांगांचे नियोजन केले आहे. मंदिर घाटावर दुतर्फा शामियाना उभारला आहे. व्हाईट आर्मी, रेस्क्यू फोर्स व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. कृष्णा नदीत लाईफ जॅकेट आणि यांत्रिक बोटींचे नियोजन केले आहे. जन्मकाळ सोहळ्यावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
फिरती शौचालये, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र अशा व्यवस्था तैनात आहेत. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी अमोल विभुते, मंगल खोत, पार्वती कुंभार, विद्या कांबळे, तानाजी निकम, श्रीनिवास पुजारी, डॉ. किरण आणुजे, संजय शिरटीकर, गुरु रिसबूड उपस्थित होते.
error: Content is protected !!