जिवंत नागाची पूजा केल्याप्रकरणी नागासह पुजारी ताब्यात

वाळवा तालुक्यातील ढवळी येथील बाळूमामा मंदिरात जिवंत नागाची पूजा करून नाग सोडण्यासाठी जाताना पुजारी जितेंद्र ऊर्फ विशाल बबन पाटील (वय ३४) यास वन विभागाने नागासह ताब्यात घेतले. इस्लामपूर न्यायालयाच्या परवानगीनंतर नागास नैसर्गिक अधिवासात सोडून पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी  सोमवारी (दि. २६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाळूमामा मंदिरात जिवंत नागाची पूजा केली जात आहे, अशी माहिती वन विभागास मिळाली. त्यानंतर वन कर्मचारी मंदिरात पोहोचले असता तेथे तसे काही आढळले नाही. मात्र पुजारी जितेंद्र पाटील नागाला घेऊन बाहेर पडल्याचे समजले. कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून जितेंद्र पाटील यास ढवळी ते भडकंबे रस्त्यावर जिवंत नागासह ताब्यात घेतले. बुधवारी इस्लामपूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने नागास नैसर्गिक अधिवासात सोडण्यास परवानगी दिली. सहायक वन संरक्षक डॉ. अजित साजणे यांनी जितेंद्र पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी, वन रक्षक भिवा कोळेकर, वनपाल डी. बी. बर्गे, प्राणीमित्र ओंकार पाटील, निवास उगळे, विक्रम टिबे, विजय पाटणे, शंकर रकटे, आदींनी केली.दरम्यान, अंधश्रद्धेचे कृत्य करणाऱ्या जितेंद्र पाटील यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आष्टा पोलिसात निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे, जितेंद्र पाटील हा ”बाळूमामांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आहे” अशी खोटी बतावणी करून बुवाबाजी करत आहे.

लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर गुरुवारी, रविवारी, अमावास्या, पौर्णिमाला घरात दरबार भरवत आहे. करणी काढणे, भानामती करणे, भूतबाधा काढणे, मूल होण्यासाठी दैवी उपाय सांगणे, देवाला कौल लावणे हे अंधश्रद्धेचे प्रकार करत आहे. यातून लोकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करत आहे. तसे निनावी पत्र आम्हाला आले आहे.

अंनिसच्या राज्याध्यक्ष सरोजमाई एन. डी. पाटील यांच्या गावीच हा प्रकार सुरू असल्यामुळे अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू आहे. या कायद्यानुसार वरील सर्व प्रकार दखलपात्र गुन्ह्यास पात्र आहेत. पोलिसांनी चौकशी करून हे अंधश्रद्धेचे प्रकार बंद करावेत. निवेदनावर राहुल थोरात, शंकर माने, डॉ. संजय निटवे, आशा धनाले, शशिकांत बामणे आदींच्या सह्या आहेत

error: Content is protected !!