रुकडीत खड्यात वृक्षारोपण करुन ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध

रुकडी

येथील रेल्वे भुयारी मार्गाजवळील मुख्य रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यात ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध केला.
लाखो रुपये खर्चुन येथे बांधलेल्या रेल्वे भुयारी मार्गालगतच्या मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. हा मुख्य रस्ता असल्यामुळे रहदारीही जास्त असते. भुयारी मार्ग पार करून आल्यानंतर लगेच हा खड्डा असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गावात येणारी अवजड वाहने, के.एम.टी., स्कूल बसेस, विद्यार्थी, प्रवासी यांना अडचण ठरत आहे; पण ग्रा.पं. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या खड्ड्यात मोठे झाड लावून यावर बॅनर लावला. हा बॅनर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवासी, वाहनधारकांचे लक्ष वेधत आहे. याप्रश्नी लक्ष घालून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!