पूर परिस्थितीला धरण जबाबदार अयोग्य; धरणातून पाणी न सोडताही पूर परिस्थिती

पाटण /ता:८- विक्रांत काबंळे

        दीर्घ काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा अचानकपणे जोर वाढवला आहे . प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ात पडणारा पाऊस व त्या ठिकाणच्या धरणात सध्या अडवले जाणारे पाणी व अद्याप कोणत्याही धरणातून पाणी सोडले नसतानाही नद्यांच्या पाणीपातळीत झालेली लक्षणीय वाढ व संभाव्य पूर परिस्थिती याचा विचार केला तर जर आभाळातून पडणारे प्रतिसेकंद महाकाय पाणी याच धरणातून अडविले गेले नसते . तर येथे पावसाळ्यात दैनंदिन पूर परिस्थिती तर निर्माण झाली असती . याशिवाय वर्षभरात सिंचन व वीजनिर्मिती साठी लागणारे पाणी कसे उपलब्ध झाले असते ? त्यामुळे पूर असो अथवा महापूर यासाठी केवळ स्थानिक धरणानांच जबाबदार धरणे हे कितपत योग्य आहे . याचाही सार्वत्रिक विचार होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

        वास्तविक धरणांची निर्मिती ही वर्षभरातील सिंचन व वीजनिर्मितीसाठी झाली ही एक बाजू असली तरी दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे याच धरणांमुळे पूर, महापूर रोखणे अथवा त्याची तीव्रता कमी करणे अशीही आहे. ही धरणेच अस्तित्वात नसती तर पावसाळ्यात आभाळातून पडणारे पाणी हे जसेच्या तसे नदीपात्रातून वहात गेले असते आणि पुर्ण पावसाळा हा निसर्गाच्या लहरी गोष्टींवर अवलंबून राहीला असता. यातूनच कोणत्याही क्षणी पूर, महापूराचा धोका उशालाच घेवून जगावे लागले असते . आणि त्याच्यावर कोणाचेही कृत्रिम नियंत्रणच राहीले नसते. अगदी सध्याचा कोयना धरणातील प्रतिसेकंद लाखाच्यावर क्युसेक्सची आवक तर अतिवृष्टीत तब्बल दोन लाख क्युसेक्स पर्यंत जाणारी हीच आवक जर धरणात न अडवता ती तशीच पुढे गेली असती . तर पाण्यासोबत पूर्वेकडे पडणारा पाऊस त्यानंतर कराड येथे कृष्णा नदीच्या माध्यमातून या जिल्ह्यासह पुढे सांगली, कोल्हापूर येथील धरणातंर्गत विभागातून येणाऱ्या पाण्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ाची काय अवस्था झाली असती याचा विचारही महाभयंकर आहे. त्यामुळे याच धरणात येणाऱ्या महाकाय पाण्याची साठवण व पूर्वेकडे नदीपात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेऊन टप्याटप्याने कमी अधिक प्रमाणात पाणी सोडण्याचे नियोजन व नियंत्रण करणे सोपे जाते. यातूनच पूर अथवा महापूराची भिती ही अपवादात्मक वर्षे अथवा ठराविक काळातच निर्माण होते. परंतु ही धरणेच नसती तर मग पावसाळ्यात कायमच डोक्यावर टांगती तलवार राहीली असती. याशिवाय पावसाळ्यात पाण्यामुळे तर उर्वरित वर्षभरात पाण्याविना जीवन असह्य झाले असते याचाही दुहेरी विचार महत्वाचा आहे.
         निश्चितच सध्या कोणत्याही धरणातून पाणी सोडले नसतानाही ज्या त्या ठिकाणी धरणात महाकाय पाणी अडविले जात असून उर्वरित वहात्या पाण्यामुळे जर बहुतांशी नद्या धोक्याच्या पातळ्या ओलांडत असतील तर मग ही धरणेच नसती तर काय झाले असते याचाही किमान विचार व्हावा. वास्तविक या पूर, महापूराला धरणांना जबाबदार धरण्यापेक्षा नदीकाठची गावे, शहरे तेथे झालेली महाकाय अतिक्रमणे, काही ठिकाणी गिळंकृत केलेले अथवा बदललेले प्रवाह व त्या त्या काळात झालेला नैसर्गिक कोप, ढगफूटी सारखी नैसर्गिक परिस्थिती , स्थानिक नद्या, ओढ्यांना आलेली फुगी हीच यासाठी बहुतांशी जबाबदार असते. परंतु ज्या धरणांमुळे अतिवृष्टी काळात महाकाय पाणी अडवून पूरांची तीव्रता कमी करून वर्षभर सिंचन, वीजनिर्मितीची गरज भागवली जाते . त्याच धरणांना दोष देत त्यांचेवर खापर फोडून अल्प ज्ञानातून गैरसमज व भिती निर्माण करणे कितपत योग्य आहे . याचाही ज्याचा त्यानेच विचार करावा असे अभ्यासू जलतज्ञांचे मत आहे.

error: Content is protected !!