आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावरून टोलेबाजी केली, तसंच अजित पवारांवर निशाणा साधला. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्यापद्धतीने बोलत होते, ते पाहून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याचं राज ठाकरे म्हणाले.
‘राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो काल संपला. त्यांना खरच राजीनामा द्यायचा होता, असं मला खरंच वाटतं. पण राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागले आहेत. हे तू गप्प बसं, ए तू शांत बस, तू माईक हातातून घे. हे सगळं होत असताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार, मी आता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच दिला तर उद्या मला पण गप्प बस सांगेल. त्या भीतीपोटी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. आता असं वागतायत, पुढे कसं वागतील, भानगड नको, म्हणून त्यांनी राजीनामा मागे घेतला,’ असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
‘काय चालू होतं, काही पोच नाही. जवळपास आतून उकळ्या फूटत होत्या, होतंय ते बरं होतंय. माझ्या मुलाखतीमध्ये मी काकांकडे लक्ष द्या, हे सांगितलं होतं. ते कधी कोणती गोष्ट करतील ते सांगता येत नाही. तो त्यांच्या पक्षातला विषय आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काही देणं घेणं नाही,’ असं राज ठाकरे म्हणाले.