राजारामबापू पाटील जन्मशताब्दी सांगता कार्यक्रम पुढे ढकलला

इस्लामपूर / ता: ३० जितेंद्र पाटील

             लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता,व स्व.बापूंच्या १०० व्या जयंतीनिमित्त शनिवार दि.१ आॅगस्ट २०२० रोजी आयोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते राजारामबापू पाटील जन्म शताब्दी समितीने जलसंपदामंत्री,व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला असल्याची माहिती लोकनेते राजारामबापू पाटील जन्म शताब्दी समितीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी दिली.

लोकनेते राजारामबापू पाटील

           वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते, गोर-गरिबांचे कैवारी,माजी मंत्री लोकनेते राजारामबापू पाटील यांचे जन्म शताब्दी वर्ष दि.१ आॅगस्ट २०१९ रोजी सुरू झाले आहे. या दिवशी राष्ट्रीय नेते खा.शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच १७ जानेवारी २०२० रोजीच्या स्व.बापूंच्या पुण्यतिथी समारंभास राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे,व अनेक मंत्री उपस्थित होते. स्व.बापूंच्या जन्म शताब्दीनिमित्त वर्षभर राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रम,उपक्रम घेण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या वतीने मुंबई येथे खा.शरद पवार,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,अनेक मंत्री यांच्या उपस्थित,पुणे येथे जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत, तसेच जन्म शताब्दी समितीच्या वतीने माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
                   स्व.बापूंच्या जन्मशताब्दी वर्षार्ची सांगताही शानदार सोहळ्याने करण्याचा समितीचा प्रयत्न होता. कासेगांव (ता.वाळवा) येथील स्व.बापूंच्या ‘पदयात्री’ स्मारकामध्ये जन्म शताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभ करण्यात येणार होता. यावेळी त्यांच्याबरोबर काम केलेले कार्यकर्ते किंवा त्यांच्या वारसांचा सन्मान आदी कार्यक्रमांचे नियोजन सुरू होते.
            मात्र सध्या जिल्ह्यासह राज्य,व देशातील कोरोनाची वाढती संख्या ही चिंतेची बाब झाली आहे. कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर समारंभ करणे उचित होणार नाही. म्हणून स्व.बापूंच्या जन्म शताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. या दिवशी कोणताही कार्यक्रम होणार नाही.
            यावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर.डी.सावंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांच्यासह राजारामबापू समूहातील पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!