वृक्ष, रोपांना पाणी घालून रंगपंचमी साजरी

पेठ वडगाव

पेठ वडगाव व परिसरात पर्यावरणपूरक रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. येथील योगसेवा फौंडेशनच्यावतीने महालक्ष्मी देवराई येथे वृक्षरोपांच्या समवेत रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व नागरिकांनी येथील वृक्षरोपांना पाणी घालण्याची सेवा देत वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज असल्याचा संदेश देत रंगपंचमी साजरी केली.
वडगाव शहर व परिसरात कोरडी रंगपंचमी साजरी करून नागरिक, विद्यार्थी यांनी सामाजिक भान बाळगले. मौजे तासगाव येथील महालक्ष्मी देवराई येथे वनविभागाने रोपण करण्यात आलेल्या पाच हजार वृक्ष रोपांचे संवर्धनाचे काम योगसेवा फौंडेशन व निसर्गप्रमी ग्रुप यांच्यावतीने सुरु आहे. यासाठी वडगाव पालिका, मौजे तासगाव ग्रामपंचायत, वडगाव परिसरातील विविध शाळा, विविध सामाजिक संस्था, अनेक सेवाभावी, निसर्गप्रमी नागरिक सहकार्य करत आहेत.
या ठिकाणी वृक्ष रोपांना दैनंदिन पाणी घालणे, वृक्षरोपांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना अशी सेवा दिली जात आहे. नव्या पिढीसमोर हा वृक्षसंवर्धन उपक्रम एक आदर्श ठरत आहे. या वृक्षसंवर्धनासाठी विविध स्तरातून सहकार्य केले जात असून शहर व परिसरातील अनेकजण आपल्या वाढदिवसानिमित्त व आवश्यकतेनुसार पाण्याचा टैंकर उपलब्ध करून देत आहेत.
रंगपंचमीच्या दिवशी बेसुमार पाण्याचा अपव्यय टाळून कोरड्या रंगांनी वृक्ष रोपांसोबत रंगपंचमी साजरी करण्याचा उपक्रम योगसेवा फौंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पाणी वाचवा या विषयावर विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी योगसेवा फौंडेशनचे सदस्य, आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराचे सदस्य, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!