प्राथमिक शिक्षक बँकेतील नोकर भरती बेकायदेशीर

प्राथमिक शिक्षक बँकेतील नोकर भरती प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी रद्द ठरवली आहे. यामुळे बेकायदेशीररीत्या भरती केलेल्या 30 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शिक्षक बँकेत मे 2019 मध्ये तत्कालीन अध्यक्ष साहेब शेख यांच्या काळात 30 लिपिक भरले होते. बँकेने मान्यता नसलेल्या संस्थेकडून ही प्रक्रिया राबविली. परशराम कल्लाप्पा कांबळे व इतर सहा जणांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सहकार आयुक्त कार्यालयातील उपनिबंधक अनिल कटके यांनी ही भरती बेकायदेशीर असून, कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. पन्हाळा शाखेला रिझर्व्ह बँकेची मान्यता नसतानाही त्या शाखेच्या नावावर 10 जण भरले आहेत, असा ठपका जिल्हा उपनिबंधकांनी ठेवला आहे.

या बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने ही नोकर भरती केलेली आहे. ही भरती प्रक्रिया बेकायदेशीर असतानाही त्याचा विचार न करता नोकर भरती करून त्यांनी बँकेचे आर्थिक नुकसान केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कमी करून बँकेच्या नुकसानीस जबाबदार धरून तत्कालीन संचालक मंडळावरही कारवाई होऊ शकते, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!