कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे पूर्ववत कधी होणार, प्रवाशांचा सवाल ?

    कोरोना काळात अनेक बंद झालेल्या रेल्वे गाड्या सुरू न झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रुकडी व वळीवडे थांब्यावर रेल्वे थांबणे बंद झाल्याने प्रवाशांना कोल्हापुरातून प्रवास करावा लागत आहे.या गाड्या पूर्ववत कधी सुटणार, याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.
   कोरोना सुरू होण्यापूर्वी कोल्हापूर ते हैदराबाद सकाळी साडेसात, कोल्हापूर ते सोलापूर रात्री साडेअकरा, तर कोल्हापूर ते बंगळूर (राणी चन्नमा एक्स्प्रेस) दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी स्थानकावरून सुटत होती. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. या मार्गावर व्यापारानिमित्त जाणाऱ्या व्यापारी वर्गाचा आकडा अधिक होता. या गाड्या सुरू करण्यासाठी नोकरदार, व्यापारी प्रवासी वर्गातून आंदोलन झाले. तसेच रेल्वे प्रशासनाला निवेदने देण्यात आली. लोकप्रतिनिधींपर्यंत हा विषय पोहोचूनही त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.

 सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सुटणारी कोयना एक्स्प्रेस, दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांची कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस व रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांची कोल्हापूर ते मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वे रुकडी व वळीवडे थांब्यावर थांबत होत्या. या परिसरातील प्रवाशांचा कराड, सातारापर्यंत रोजचा प्रवास आहे. या गाड्यांचा तेथील थांबा बंद झाल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी त्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे.
error: Content is protected !!