सांगली / प्रतिनिधी
इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा. प्रा. श्रीधर शंकर कुंभार यांना आयआयटी बॉम्बेची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली. प्रा. श्रीधर कुंभार यांनी नदी, शेती आणि पर्यावरणातील प्रदुषण या अनुषंगाने आपला शोधनिबंध सादर केला होता. त्यानुसार आयआयटी बॉम्बेने त्यांना पीएच.डी. पदवी दिली.

‘सस्टेनेबल न्यूट्रियंट मॅनेजमेंट- अ केस स्टडी ऑफ नायट्रेट इन वारणा रिव्हर बेसीन, महाराष्ट्र इंडिया’ अशा विषयाचा शोधनिबंध प्रा. श्रीधर कुंभार यांनी आयआयटीमध्ये पीएच.डी. साठी सादर केला होता. हा शोधनिबंध अत्यंत अभ्यासपूर्ण रितीने प्रा. कुंभार यांनी आयआयटीला यशस्वीपणे सादर केला. प्रा. कुंभार हे पलुस तालुक्यातील माळवाडी-भिलवडी येथील आहेत. ते राजारामबापू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील विभागात कार्यरत आहेत. त्यांना पीएच.डीच्या शोधनिबंधासाठी आयआयटीच्या सितारा विभागातील डॉ. बकुल राव, आरआयटीच्या डायरेक्टर डॉ. सुषमा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर प्रा. कुंभार यांच्या या शोधनिबंधासाठी आयआयटीमधील डॉ. मिलिंद सोहणी, डॉ. आनंद राव तसेच कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी. सावंत, आरआयटीमधील प्राचार्य व सर्व विभागाचे डिन यांचे प्रोत्साहन लाभले.
प्रा. श्रीधर कुंभार यांनी सादर केलेल्या शोधनिबंधामध्ये प्रामुख्याने पर्यावरणीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. नदीमध्ये होणारे प्रदुषण, त्यामुळे पर्यावरणाला होणारी बाधा, शेतीसाठी वापरले जाणारे पाणी आणि रासायनिक खते या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रानुसार शेतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे, असे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले आहेत. भविष्यात शेतीचे क्षेत्र चांगल्यारितीने सुधारण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शेती उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे. तसेच पर्यावरणाच्या असमतोलामुळे व वाढत्या प्रदुषणामुळे भविष्यात शेती क्षेत्रावर होणारे परिणाम रोखण्याची गरज आहे, असे महत्वपूर्ण निष्कर्ष या शोधनिबंधात मांडण्यात आले आहेत. या शोधनिबंधाचे प्राप्त परिस्थितीमधील महत्व आणि पर्यावरणीय संवर्धन या पार्श्वभूमीवर आयआयटीच्या तज्ञ समितीने प्रा. कुंभार यांच्या शोधनिबंधाची पडताळणी करून त्यांना पीएच.डी. पदवी दिली.