रुईतील पूरग्रस्त चिमणी-पाखरांना मिळालं जीवदान ; कोल्हापूर डिझास्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटीचे योगदान

रुई / ता :८- भाऊसाहेब फास्के

            पंचगंगा नदीला पूर आल्याने केवळ नागरिकांनाच नव्हे तर पक्षीमात्रांनाही त्याचा फटका बसत असतो. प्रत्येकाच्या नैसर्गिक जीवनातील एक महत्वाचा भाग म्हणजे अपत्यप्राप्ती. मानवी जीवनाबरोबरच पशुपक्ष्यांनाही हा निसर्गनियम लागू पडतो. प्रत्येक जीव आपल्या पिलांसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी धडपडत असतो. त्याचा प्रत्यय शुक्रवारी रुई (ता. हातकणंगले ) येथे आला.

               नदीरोडवरील मगदूम विहिरीलगतच्या झाडावर चिमण्यांनी पंचवीसहून अधिक घरटी बांधली आहेत, पण पुराच्या वाढत्या पाण्यामुळे त्यातील काही घरटी बुडण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे घरट्यातील पिलांबाबत पहाटेच्या सुमारास चिमण्यांची घालमेल चालू होती. शुक्रवारी पहाटे पंचगंगा जलतरण आणि मॉर्निंग वॉक मंडळाच्या सदस्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. आपल्या पिलांच्या काळजीपोटी चिमण्यांची सुरु असलेली धडपड सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब फास्के आणि शकील मुजावर यांनी मोबाईलवर चित्रित केली.

             श्री.फास्के यांच्याकडून सदरची छायाचत्रे आणि पोस्ट “घरटं चाललं पाण्याखाली, जीव कासावीस होतो! पूरग्रस्त आम्हीही पण लक्षात कोण घेतो!!” या मथळ्याखाली व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आली. जिल्ह्यातील अनेक ग्रुपवर ती छायाचित्रे व्हायरल झाली. ही पोस्ट माजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी धनंजय पाटील यांच्या वाचनात आली. त्यांनी लगेच कोल्हापूरच्या डिझास्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा जीवरक्षक म्हणून परिचित असलेले दिनकर कांबळे यांच्याशी संपर्क साधला.

            चिमण्यांच्या पिल्लांचे जीव वाचवण्याबाबत त्यांनी सूचना केली. दिनकर कांबळे यांनी अमित पाटील (टोप ), अर्जुन भोसले (टोप), सुरेश कांबळे (कोल्हापूर) या सहकाऱ्यांना सोबत घेत दुपारी तीन वाजता घटनास्थळ गाठले. त्यांनी पुराच्या पाण्यात उतरुन रस्सीच्या साहाय्याने अडीच – तीन तासांच्या प्रयत्नानंतर चिमण्यांची घरटी जवळपास चार फुटांनी उंचावर घेतली. यामुळे सर्वच घरट्यातील पिलांना जीवदान तर मिळालेच शिवाय चिमण्यांचा जीवही भांड्यात पडला. तरुणांच्या या टीमला तैमुर उर्फ अब्दुल मुजावर, नंदकुमार साठे यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी आवश्यक साहित्य तत्काळ उपलब्ध करुन दिले. एकूणच कोल्हापूरच्या तरुणांनी रुईपर्यंत धाव घेऊन चिमणीपाखरांविषयी दाखवलेली संवेदना निश्चितीच कौतुकास पात्र ठरली आहे.

error: Content is protected !!