रुई /ता: ३- मनोज अथणे
रुई (ता. हातकणंगले ) येथे मागील पंधरा दिवसापासुन कोरोना रोगाने थैमान घातले आहे .त्यामुळे गावात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असुन परिणामी गावात कोरोना रुग्णांची संख्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गावात सुरुवातीला सहारा नगर,राजमाने हायस्कूल परिसर, रुकूमशाहा परिसरात कोरोनाने चांगलाच शिरकाव करून अवघ्या काहीच दिवसांत करपे मळा, कन्या शाळा, मगदूम गल्ली, आबदान मळा परिसर, क्रांती सोसायटी परिसर,बाजारपेठ परिसरा पर्यंत पसरून विळखा घातला आहे . गावातील एका तरुणासह तीन व्यक्तींचा बळी गेला आहे. संबंधित परिसर देखील बंदिस्त करण्यात आला आहे .
पण गावातील काही अतिउत्साही लोकांमुळे कोरोणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कुठेतरी खो बसताना दिसत आहे. प्रशासनाने कोरोणाविषयी अनेक निर्बंध घालून देखील याबाबत ग्रामस्थांमध्ये कुठेही गांभीर्य दिसत नाही. प्रशासकीय नियमांना धाब्यावर बसवून अप्रत्यक्षपणे दुसऱ्याचा जीव टांगणीला लावण्याचाच प्रकार होत आहे .काही जाणकार नागरिकांतून याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला .तर प्रसंगी वादा-वादीचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे गावातील सर्वच परिसरामध्ये कोरोनाचा चांगलाच फैलाव वाढताना दिसत आहे.गावातील अनेक तरुणाई फक्त सोशल मीडियावर उपदेशबाजी करत असुन हीच तरुणाई कोरोना नियंत्रणासाठी प्रामाणिक काम केली . तर गावातील कोरोना रोगाच्या प्रसाराला नक्कीच आळा घालता येईल, नाहीतर रुईत कोरोना लवकरच अर्धशतक पुर्ण करेल हे नक्की.