रुईत लोककलाकारांचा मेळावा उत्साहात : मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही
रुई, दि.18 (प्रतिनिधी)
आयुष्यभर कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या लोककलाकारांना जनमाणसातून मानसन्मानाची खरी गरज आहे कारण तीच त्यांच्या कामाची खरी पोचपावती आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले. शासनाकडून लोककलाकारांना मानधन आणि विविध मागण्यांबाबत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

रुई (ता. हातकणंगले) येथील लोक कलाकार संघ शाखा व जय हनुमान संगीत भजनी मंडळ यांच्यावतीने आयोजित लोक कलाकारांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ.शकीला कोन्नूर होत्या. यावेळी उपसरपंच सौ. अश्विनी पोवार, जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय काश्मिरे, भाऊसाहेब फास्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले
शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा निवड समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विलासराव पाटील यांचा सत्कार श्री. फास्के यांच्या हस्ते करण्यात यावेळी आला. ग्रामीण भागाची संस्कृती जपण्याचे काम करणाऱ्या लोककलाकारांचे कार्य कौतुकास्पद असून असंख्य कलाकारांना वृद्धापकाळात आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने योग्य ते मानधन आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची गरज असल्याचे मत भाऊसाहेब फास्के यांनी व्यक्त केले.
यावेळी सुदर्शन खाडे, राजेंद्र सुतार, शाहीर सुरेश माने यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास सुरेश शिंदे, नंदकुमार बन्ने, कुबेर अपराध, जयसिंग पाटणकर, अनुप खुरपे, जगदीश शिंगे, आनंदा साळुंखे, ज्योतीराम मावळे, राजेंद्र मोरबाळे, शौकत बहुरूपी, सागर जोशी, भूपाल माने, सौ. शकुंतला शिंदे, सौ.सारिका मगदूम यांच्यासह विविध गावातील भजनी मंडळे आणि महिला भजनी मंडळाच्या सदस्या तसेच विविध क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश जाधव यांनी आभार मानले.
