समृद्धीने केली अपंगावर मात ; धडधाकट युवकांच्या डोळ्यात घातले झणझणीत अंजन

रुकडी / ता : १५

           रुकडी ( ता. हातकणंगले ) येथील समृद्धी प्रकाश पाटील यांनी अंपगत्वावर मात करत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले घवघवीत यश .महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या आणि आजच जाहीर झालेल्या महाराष्ट्र गट-क परीक्षा-2019 (लिपिक टंकलेखक)/ मंत्रालय लिपिक या पदावर महाराष्ट्रात 118 व्या क्रमांकाने समृद्धीची निवड झाली.
            १२ एप्रिल १९९८ साली वयाच्या १६ व्या वर्षी पाठीच्या मणक्याला म्हशीने जोरात मार दिल्याने अपघाताने आलेलं अपंगत्व,भूल न देता करावं लागलेल ऑपरेशन आणि दरम्यानच्या काळात सोसलेल्या असंख्य कळा.. दोन- तीन वर्ष सतत झोपून राहिल्याने पाठीत झालेल्या जीवघेण्या जखमा आणि घरच्या गरीबी सोबत आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी सोबत असणारी चाकाची खुर्ची.. वडीलांचे हरवलेलं छत्र अन् आईच्या शिवणकामावर गुजराण करणारे घर.. आणि अपंगत्वामुळे आलेला आयुष्याचा अभंग अंधार.. हे सगळे असताना कमी म्हणून फेब्रुवारी २०१५ मध्ये पुन्हा अपघात झाला . त्याच त्याच वेदनेच्या उजळण्या समृद्धीच्या आयुष्यात चालू झाल्या
म्हणतात ना अपंगत्व शरीराला येतं, मनाला नाही.

              समृद्धी प्रकाश पाटील

         इच्छाशक्तीच्या जोरावर उगवणाऱ्या सूर्याला सुद्धा गुलाम बनवता येतं हे आज समृद्धीनं सिद्ध करून दाखवलं. एवढ्या मोठ्या अपघातानंतर पायांची हालचाल होत नव्हती, हातांची हालचाल होत नव्हती, साधा पेन सुद्धा हातात धरता येत नव्हता,तेव्हा तिने पुन्हा शिकण्याचा निर्धार केला होता. बरेच जण तिच्या निर्णयावर हसले पण आई आणि छोटी बहिण यांनी मात्र तिला पाठिंबा दिला आणि अथक परिश्रमाने तिने २००९ मध्ये तिने पदवी प्राप्त केली . पदवी नंतर वाट धरली स्पर्धा परीक्षेची.. घरच्या अडचणीमुळे, आर्थिक ताणामुळे आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अभ्यासात ना दिशा होती ना
सातत्य. पण प्रत्येक धडपडणाऱ्या ध्येयवेड्याला एक गुरु  नक्कीच भेटतो. अगदी त्याचप्रमाणे तिला आचार्यश्री प.पु. १०८ चंद्रप्रभसागरजी मुनी महाराजजींचे मार्गदर्शन मिळाले. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देऊन आचार्यश्रीं मदत करतात त्याप्रमाने तिची सर्व जबाबदारी उचलली. विद्यासन्मतीदास सेवा संस्थेच्या माध्यमातून तिला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला पाठवलं, जून २०१५ मध्ये पुण्यात दाखल झाली. गेल्या चार वर्षात राज्यसेवा मुख्य परिक्षेपर्यंत धडक मारली पण पदरी अपयश आणि निराशा.. पण आचार्यश्रींच्या प्रेरणेने आणि वीराचार्य अकॅडमी चे मार्गदर्शक श्री. सुहासजी कोरेगावे सर , श्री.ओमकारजी शेंडूरे सर आणि श्री. प्रवीणजी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने तिने कधी हार मानली नाही आणि म्हणूनच अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या आणि आजच जाहीर झालेल्या महाराष्ट्र गट-क परीक्षा-2019 (लिपिक टंकलेखक)/ ‘मंत्रालय लिपिक’ या पदावर महाराष्ट्रात 118 व्या क्रमांकाने त्यांची निवड झाली . तिच्या या निवडीने रुकडी सह परिसरातून तिचे कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!