रूपा कुलकर्णी
उद्योग म्हणजे नेमके काय? तो कसा करायचा? कॉस्टिंग कसे काढायचे? फायदा किती असला पाहिजे याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे आमचे पंडित काका म्हणजेच इचलकरंजी येथील एफ आय इ चे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती श्री. पंडितराव दाजी कुलकर्णी.
त्यांच्यासमोर भल्याभल्यांची भंबेरी उडायची. त्यांच्या आडव्या तिडव्या प्रश्नांना जो नीट उत्तरे देऊ शकेल तो यशस्वी. कुठलाही विषय काढा त्यातील त्यांचे ज्ञान आणि प्रश्न तुम्हाला क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाहीत. ज्ञान, विद्यान, माणुसकी आणि दानत ही त्यांची ख्याती.
कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवत असेल, आपल्या हालचालीबद्दल कुणालातरी कधीतरी उत्तरे द्यावी लागणार ही जाणीवच माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. माझ्यासाठी पंडित काका हे अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व होते. मी काय करत होते, सध्या माझे काय सुरु आहे हे सगळे ते आमची कधीही भेट झाली की आठवणीने विचारायचे. त्यांचे ते विचारणे माझ्यासाठी खूपच अनमोल असायचे. अर्थात ते विचारणे सहज सोपे नसायचे, हेही तितकेच खरे.
मला आठवतं, मी ‘खाऊघर’ ओपनिंगचे आमंत्रण द्यायला गेले होते त्यावेळी मला त्यांनी संपूर्ण वर्षाची माझी बॅलन्सशीट कशी हवी हे सांगितले.ते खूप अवाढव्य आव्हान होते. त्यांना नमस्कार करुन बाहेर पडताना मला त्यांनी विचारले “मग करणार का हा बिझनेस?” मी त्यांना सांगितले “हो!… करणार आणि तुम्ही सांगितलेल्या खाचाखोचाही लक्षात ठेवणार..”
एकदा मला व्हाट्सएपवर गुरु कसा असावा याबाबत एक व्हिडिओ आला होता. त्यात असे होते की गुरु असा हवा की ज्यांच्या सानिध्यात आपल्याला निवांत वाटता कामा नये. सारखी अस्वस्थता, एक अनामिक अस्थिरता वाटायला हवी. परंतु त्यांच्या सानिध्यात राहता यावे ही ओढ हवी. हे पाहत असताना माझ्या नजरेसमोर त्यावेळी एकमेव व्यक्ती आली ती म्हणजे पंडित काका.
मला त्यांनी खाऊघरात यावे, पाच मिनिटे खाऊघरात बसावे आणि मला मार्गदर्शन करावे अशी खूप इच्छा होती. एक ना एक दिवस काका येतील हे स्वप्न मी रोज पहायचे पण ते स्वप्न अपूर्णच राहिले. असो! नियतीपुढे कोणाचेच चालत नाही हेच खरे.
लॉकडाऊनमध्ये काका त्यांच्या गच्चीवर आणि मी आमच्या गच्चीवर फिरत होते त्यावेळी आम्ही एकमेकांकडे पाहत फोनवर बोललो तीच आमची शेवटची भेट ठरली. मला म्हणाले “काय करणार? अडकून पडलोय. तू काय लॉकडाउनमध्ये फार बिझी आहेस काय? गप्पा मारायला ये जरा!” असे काकांनी मला हक्काने सांगितले. मनाने रोज येत होते हो काका पण केवळ तुम्हाला या काळात कोणतेही इन्फेक्शन व्हायला नको म्हणून आले नाही. मला काय माहीत की आता आपण या पुढे कधीच भेटणार नाही.
परवा 4 जुलैला, तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला फोन ही केला होता पण तुम्हाला बरं नसल्याने आपल्याला बोलता आले नाही. तुम्हाला गुरू म्हणून कोटी कोटी प्रणाम.
काका खूप एकटे एकटे वाटते हो.
तुम्ही सदैव आठवणीत राहाल.