सद्गुरु श्री वामनराव पै.

     जीवनामध्ये ‘पहाणे’ या गोष्टीला फार महत्त्वाचे स्थान आहे.आपण जे पहातो ते त्वरीत मनात भरते आणि जे डोळ्याला दिसत नाही ते मनाच्या कक्षेत सुद्धा येत नाही.म्हणून ‘दृष्टी आड ते सृष्टी आड’ अशी सुंदर म्हण आहे.हा मुद्दा लक्षात घेतला की ‘टी. व्ही.’ किंवा दूरदर्शन हे मानवी जीवनात किती महत्त्वाचे स्थान व्यापून आहे हे ध्यानात येईल.ज्ञानेन्द्रियांमध्ये ‘कान आणि डोळे’ ही दोन महत्त्वाची ज्ञानेन्द्रिय असून त्यांच्या द्वारे मानवी मनावर बरे-वाईट संस्कार केले जातात किंवा होत असतात.टी.व्ही. च्या बाबतीत कान आणि डोळे या दोन्ही इन्द्रियांना मुक्त वाव (Full scope) मिळत असतो म्हणूनच टी.व्ही.च्या माध्यमातून मानव जातीचे भले करता येईल किंवा संपूर्ण वाटोळे सुद्धा करता येईल.

    टी.व्ही.चे कार्यक्रम आपण जे पाहतो त्यात समाजाचे कल्याण घडविण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनाचे कार्यक्रम अपवादात्मक रीतीने दाखविले जातात. वास्तविक,टी.व्ही.चे माध्यम हे प्रामुख्याने समाज प्रबोधन करण्यासाठीच असून त्या प्रबोधनातून समाजाची उन्नती व उत्कर्ष साधावयाचा असतो. परंतु टी.व्ही. चे कार्यक्रम त्या उद्देशाने आयोजित केलेले आढळून येत नाहीत.वास्तविक,टी.व्ही. चे कार्यक्रम समाजाच्या अभिरुचीप्रमाणे न होता
    समाजाची अभिरुची उंचावण्यासाठी व्हायला पाहिजेत.लोकांना जे आवडते त्या प्रकारचे कार्यक्रम देण्याने लोकांच्या बुद्धीची उंची न वाढता ती खालावत जाते.हिरो म्हणजे नायक,शरीर प्रकृतीने कसाही काडी पेहलवान असला तरी जाण्याची शक्यता अधिक असते.म्हणून लोकांच्या बुद्धीची व सुसंस्कृतपणाची उंची वाढविण्यासाठी टी.व्ही.चे कार्यक्रम सादर केले गेले पाहिजेत,परंतु वस्तुस्थिती मात्र शोचनीय अशी आहे.छायागीत सारखे कार्यक्रम व खुन-मारामारीच्या मालिका व चित्रपट प्रकर्षाने टी.व्ही.वर दाखविले जातात.
   हे कार्यक्रम पाहून तरूण पिढीच्या मनावर भयानक संस्कार होत असतात,याची दखलच घेतली जात नाही. आपण टी.व्ही.वर जे वारंवार पहातो आणि ऐकतो,त्याचे संस्कार जबरदस्त स्वरुपात बहिर्मनावर होतात व नंतर ते बहिर्मनातून अंतर्मनात जाऊन तेथे मूळ धरतात. गँगवार (टोळीयुद्ध) व तरूण मुलामुलींची प्रेमप्रकरणे,त्यातून निर्माण होणारे वादळ व गोंधळ,हे सर्व अनिष्ट प्रकार टी.व्ही.संस्कृतीच्या संस्कारांतून होत असतात.रिंकू पाटील किंवा जक्कल-जगताप सारखी प्रकरणे ही सर्व टी.व्ही. व चित्रपट संस्कृतीचे परिणाम होत.टी.व्ही. संस्कृतीतून गुंड किंवा खुळा (इडिएट) निर्माण न होता शूरवीर व सुसंस्कृत अशी पिढी निर्माण होणे आवश्यक आहे.शौर्य कशाला म्हणतात हे सुद्धा तरूण पिढीला कळणे आवश्यक आहे.सुरा किंवा तलवार शत्रूच्या पोटात खुपसणे किंवा पिस्तूल-स्टेनगनमधून बेछूट गोळीबार करून अनेक लोकांना ठार मारणे यात कुठल्याही प्रकारचे शौर्य नसते,असते ते केवळ क्रौर्य.असले नीच राक्षसी प्रकार कोणतीही हृदयशून्य किंवा अक्कलशून्य माणसे करू शकतात,ही वस्तुस्थिती टी.व्ही.माध्यमातून लोकांना समजावून देणे आवश्यक आहे.टी.व्ही.त काय किंवा चित्रपटात काय,वाटेल ते दाखविले पडद्यावर तो अनेकांना नुसत्या हाताने पाणी पाजतो.ही लढाई करताना हिरोने गळ्याला बांधलेली नेकटाय किंचित सुद्धां विस्कळीत होत नाही.तोच प्रकार हिरो-हिरॉइनचा.एकमेकांच्या पाठी उद्यानामध्ये ते मुक्तपणे धावत असतात व पळत असतात,परंतु त्या उद्यानात त्या दोघांवाचून अन्य कोणीही माणूस सापडेल तर शपथ.
    ह्या सर्व भन्नाट व फालतू गोष्टी पाहून तरूण पिढी पिसाळली नाही व चेकाळली नाही तरच नवल. पडद्यावरचे हे भंकस प्रकार पाहून तरूण पिढीतील युवा-युवती त्याप्रमाणे अनुकरण करू लागतात व सरते शेवटी फसतात.तरुण पिढीतील युवा-युवती राष्ट्राचे आधारस्तंभ असतात.परंतु तेच जर पडद्यावरील चित्रे पाहून बहकू लागली तर या राष्ट्राचे भवितव्य काय घडणार हे सांगायला ज्योतिषी नको.
   थोडक्यात,टी.व्ही. वर असे कार्यक्रम दाखविले गेले पाहिजेत की त्यातून आबाल-वृद्धांना उत्तम प्रबोधन होऊन ते जीवन संग्रामात यशस्वी होतील व राष्ट्राच्या उभारणीत आघाडीवर राहतील.

संदर्भ ग्रंथ:दृष्टी.
पान क्र.102.
✒️ प्रकरण:टी.व्ही. संस्कृती.

9850295479 7350263690

error: Content is protected !!