
कोल्हापुर / प्रतिनिधी
शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीत विलास जगताप (वय-49 वर्षे रा. श्री कॉलनी , गल्ली नंबर तीन , लाईन बाजार कोल्हापूर) हे कोरोनाच्या संसर्गामुळे घोडावत कोवीड सेंटर येथे उपचार घेत असताना ता.26 ऑगष्ट 2020 रोजी मयत झाले. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगी ,एक मुलगा असा परिवार आहे . पोलीस कर्तव्यात असताना जे कर्मचारी कोरोना बाधीत होऊन मृत्युमुखी पडले आहेत. अशा कोविड योद्धयाना पन्नास लाख रु. शासनाने जाहीर केले होते. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पाठपुरावा करून पन्नास लाख रुपयांचा धनादेश आज जगताप कुटुंबियांच्या घरी जाऊन संजित जगताप यांच्या पत्नी श्रीमती आश्विनी जगताप यांच्याकडे स्वाधीन केला.
शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीत विलास जगताप हे दिनांक 24 मे 2017 पासून नेमणुकीस होते. त्यांना कामावर असताना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना अतिग्रे येथील घोडावत कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते . पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांच्या मृत्यृनंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तात्काळ पाठपुरावा करून पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीत विलास जगताप यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांचा धनादेश शासनाकडून मिळवुन दिला. तसेच काही अडचणी असतील तर मुलांच्या शिक्षणाबाबत काही मदत लागल्यास संपर्क करण्याबाबत आश्वासन देखील दिले.

यावेळी संजित जगताप यांचे वडील विलास जगताप, आई आक्काताई जगताप मुलगा यश जगताप व मुलगी दर्शना जगताप तसेच पोलीस उपअधीक्षक अमृतकर ,पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सपोनि किरण भोसले पोहेकॉ.श्रीकांत मोहिते, सुनिल जांभळे हे उपस्थित होते.