माणगाव ग्रामपंचायतीकडून महावितरणवरच जप्तीची कारवाई, राज्यातील पहिलीच कारवाई

      थकित विज बिलामुळे महावितरणकडून ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. मात्र महावितरणच्या उपकेंद्राची कराची रक्कम थकली म्हणून माणगाव ग्रामपंचायतने उपकेंद्रावर जप्तीची कारवाई करत महावितरणलाच धडा शिकवला आहे. १६,१४,४०१ थकीत करापोटी माणगाव येथे महावितरणच्या उपकेंद्रावर झालेली जप्तीची कारवाई ही राज्यातील पहिलीच कारवाई ठरली आहे यामुळे महावितरण प्रशासन हबकले आहे. 

 हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाने महावितरण कंपनीला उपकेंद्राचा थकीत कर २०१५ - २०१६ पासून भरला नाही यासाठी कंपनीच्या माणगाव येथील कार्यालयास  पहिल्यांदा २ सप्टेंबर २०२३ रोजी १२९ (१) ची पहिली वसुली नोटीस दिली.  त्या नोटीस ची मुदत संपल्यानंतर ही १२९ (२) नोटीस दिली. त्याची मुदत संपल्यानंतर ही त्यांनी उपकेंद्राचा थकीत कर भरला नाही. सात दिवसापूर्वी अंतिम जप्ती आदेश बजावण्यात आला होता. त्यानंतर ही त्यांनी उपकेंद्राच्या थकीत कर भरला नसल्याने एक मार्च २०२४ रोजी महवितरन कंपनीचे माणगाव येथील उपकेंद्रावर रीतसर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये जप्ती अंमलदार म्हणून ग्रामसेवक बी.बी.राठोड यांची नियुक्ती केली. आणि थकीत करापोटी जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये उपकेंद्रात असणारे लाकडी टेबल दोन, लोखंडी टेबल एक , लोखंडी बाकडे एक , लाकडी खुर्ची एक  , प्लास्टिक खुर्ची एक , कुशन खुर्ची दोन आदी साहित्य जप्त करण्यात आले.
 जप्ती कारवाईमध्ये सरपंच राजू सरपंच , उपसरपंच विद्या जोग , जप्ती अंमलदार व ग्रामविकास अधिकारी बी बी राठोड , गावकामगार तलाठी सोमनाथ शिंदे , पोलिस पाटील करसीद्ध जोग,माजी उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील ,राजगोंडा पाटील, संजय उपाध्ये, अविनाश माने, सुनीता मगदूम लिपिक मायाप्पा रुपणे,प्रशांत तांदळे, व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

” कारवाईपूर्वी महावितरण कंपनीस पत्र दिले होते. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयास कळविले होते. महावितरण कंपनीने थकवलेला जवळपास सोळा लाख रुपये कर जर भरला नाही तर जप्त केलेल्या वस्तूंचा जाहीर लिलाव करून उर्वरित मालमतेवर ग्रामपंचायतीचा बोजा नोंद करून थकबाकी ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल वसुली नियम १९६७ नुसार वसुलीची कारवाई करु”
-राजू मगदूम, सरपंच

error: Content is protected !!