जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. २०२० या वर्षाचा हा पुरस्कार जाहीर
मुंबई / प्रतिनिधि
ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

आशाताई यांनी आजवर हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. प्रादेशिक भाषांवर असलेलं त्यांचं प्रेम वेळोवेळी रसिकांपर्यंत पोहोचलंच आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं होतं. तरुण गायकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं. त्यातून युट्यूबचा विचार पुढे आल्याचं त्या म्हणाल्या होत्या.