शनिवारचा दिवस होता, त्यामुळे शाळेतून थेट रानात यायचं……… हे आमच्या बापानं रात्रीच ठरवलं होतं……..अन् ठरल्याप्रमाणे शाळेची पिशवी पाठीला लावत मी दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या ” शेटे मळ्यात ” पोहोचलो.
नुकताच त्यावर्षी पाचवीच्या शाळेत गेलो होतो. आळतेच्या रेणुका मंदिरालगत हायस्कूल शाळा……..आणि तिथून रानात जायचं म्हणजे किमान तासभर लागत होता….. मात्र आज मी रानात अर्ध्यातासातच पोचलो होतो, कारण आदल्या दिवशी घरात घडलेलं महाभारत माझ्या डोळ्यासमोरून गेलं नव्हतं.दिवसभर उन्हात तोडलेलं ” गवारी ” बाजारात विकून माझ्या आईला वीस रुपये मिळालं होतं. पण दुकानाला जाताना माझ्या कडून ते पडलं होतं. दुकानातनं रेशन न आनताच मोकळ्या हातानं मी घराकडं आल्यालं बघून आईनं खुप – खुप मारलं. आणि पोराला मारलेलं बघून आईला शिव्या घालतच माझा बाप भरल्या ताटावरनं रात्रीच रानात वस्तीला गेला होता.

माझ्या या चुकी मुळं सारं घर उपाशी होतं. उन्हाचा तडाका वाढत होता, तसा बापाच्या हातचा ” टिकाव ” मोठ्या जोरानं हाराटी खनत होता. अंगावर फाटलेली बंडी अन् त्यातील येणारा घामाचा वास माझ्या लहानग्या जिवा ला जाणवत होता पण उपाशी राबणार्या बापाकड बघून माझीच मला लाज वाटत होती …….
शाळेची पिशवी शेवरी च्या ठाप्याला अडकवत असतांना च बाप टिकावं बाजूला सारत बोलला धनप्या छपरातनं पाणी तर तांब्याभर आणतोस का ? घामेघूम बापाची नजर अन् पहाटे पासून उकरलेला बांध बघत चार पावलात चं मी छपरातून पाण्याचा तांब्या घेवून आलो. लिंबाच्या झाडाला पाठ टेकत एका दमात बापानं तांब्या संपवला. उपाशी बापाचा अवतार अन् त्या रागात केलेलं पाच गड्यांचं काम हे कुणाला सांगुण पटणारं न्हवतं……
” दुपारचं दोन वाजत आलं………. तुझी आई – जेवानं घेवून आली न्हाई ……..कुठं मेली की काय…………” तु काय खाल्लास की नाही ……. हे सगळं वाक्य बापानं एका दमातचं बोललं…….. तेवढ्या त छपराच्या जवळनं आईचा आवाज आला ” धनू ” जेवनाची पाटी उतरायला धर.
जेवनाची पाटी माझ्या डोक्यावर घेवून मी बापा जवळं आलो, तर भरलेली घागर घेवून आई मागोमाग आली. झाडाखालची ढेकळं बाजूला सारत आईनं आम्हाला जेवायला वाढायला सुरुवात केली.
” करके आण्णा ” च्या डेअरी त मिळालेल्या तीन कप्याच्या डब्यात आईन आज जेवनं आणलं होतं……. ” चपात्या अन् आंब्याचं शिखरण “
पाहून मलाच धक्का बसला होता. कारण रात्रीचं वीस रुपये पडल्यामुळं रेशन तर नव्हतंच , तर आईनं
शिखरणासाठी आंबा आणलं कुठुनं…… पण पुन्हा माझ्या बोलण्यामुळं नव्या वादाला सुरुवात होणार होती हे मला माहीत होतं…….. रात्रीच्या भांडणामुळं बापाच्या घशातुन घास गिळत न्हवंता, चपात्या बाजूला सारून डब्याच्या मधल्या कप्यातला भात बापानं मागितला, डब्याचं टोपनं उघडताच ते मोकळं दिसलं…… बहुतेक मी गडबडीत भात भरायला विसरलो अशी आईनं कबुली दिली अन् तिच्या डोळ्यात आसवांचा डोह उभा राहीला. ……… पुन्हा बापानं आईला शिव्या घातल्या……. आणि आहे त्या जेवणावर समाधान मानत तो पुन्हा बांध खनायला लागला…….!
आज आई माझ्या पासुन कांही तरी लपवत आहे, हे मला जाणवत होतं…….. मी तीला माझी ” शपथ ” घातली आणि विचारलं पैसे नसतांना आंबे कुठुन आणले आणि भात कसा विसरलीस.
आईने मला घट्ट मिठी मारली आणि घरातलं चार पायली शाळू सकाळ – सकाळी वडगावच्या बाजारात विकून डझन भर आंबं विकत आणल्याचं सांगितलं पण धनू तांदळाला पैसे च संपल्याने भात विसरल्याचं खोटं बोलावं लागल्याचं ती हुंदके……. देत – देत सांगत होती………!
धनंजय टारे – पत्रकार 9011561690