जयसिंगपूर /ताः १३-प्रतिनिधी
सेंद्रिय भाजीपाल्या बरोबरच रानभाज्यांचे आपल्या आरोग्यासाठी असणारे महत्त्व ओळखून त्याचा आपल्या आहारात वापर करावा. अनेक आजारात रानभाज्या गुणकारी, आरोग्यदायी आहेत. त्यांच्या सेवनाने आरोग्य संपन्न जीवन जगता येईल. नागरिकांनी याचा फायदा करून घ्यावा, असे प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले .
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्यावतीने तालुका स्तरावर रानभाजी महोत्सव आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी बाजाराचे आयोजन कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त भांडारच्या प्रांगणात करण्यात आले. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उद्यानपंडित गणपतराव पाटील बोलत होते.

तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सर्वांचे स्वागत केले. पंचवीस प्रकारच्या वेगवेगळ्या रानभाज्या यावेळी मांडण्यात आल्या होत्या. आरोग्यसंबंधी रानभाज्यांचे महत्व याची माहिती मंडळ कृषी अधिकारी महावीर गायकवाड, कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक संजय सुतार, प्रकाश वठारे, अशोक कोडोले, आत्माचे कृषी विस्तारक संदीप देसाई, किर्तीकुमार पाटील तसेच कृषी सहाय्यकांनी ग्राहकांना दिली.
सेंद्रिय भाजीपाला व फळाच्या विक्रीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, जयसिंगपूर उदगाव बँकेचे व्हा.चेअरमन महेंद्र बागी, सुरेश पाटील यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. रानभाज्या व सेंद्रिय उत्पादनाची माहिती घेतली.
गेल्या दोन महिन्यापासून शिरोळ, हातकणंगले तालुका व परिसरातील सेंद्रिय भाजीपाला उत्पादकांना बाजारपेठ मिळावी . हा हेतू ठेवून प्रत्येक गुरुवारी दुपारी दोन ते सहा या वेळेत या बाजारपेठेचे नियोजन केले जाते. सेंद्रिय भाजीपाल्याबरोबरच रानभाज्याही उपलब्ध झाल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत होते. कृषी विभागाला तसेच प्रत्येक शेतकऱ्याला स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला होता. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा बाजार भरविण्यात आला.
बाळासो कुंभोजे – आळते, अनिल मगदूम- लिंगनूर, राजकुमार नकाते-हरोली, सर्जेराव पुंदे- शिरोळ, रमेश केरीपाळे -शेडशाळ, जगदीश पाटील, अश्विन पाटील- चंदूर, संदीप बिळीशेट्टे- गणेशवाडी, मृगेंद्र हिरेमठ- आलास, राहुल संकान्ना- आळते, अजिंक्य मगदूम-कुंभोज आदी शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळे तसेच आत्माच्यावतीने आंबूशी, कवळा, रानअळू,आघाडा, घोळ,केना, तांदळ, शेवगा, अंबाडी, पातरी, दिंडा, टाकळा, कुडा,गुळवेल, भुईआवळी, मायाळू, पिंपळ, करटोळी आदी रानभाज्या आणल्या होत्या. यावेळी अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, दत्त भांडारचे महाव्यवस्थापक एस. ए. घोरपडे, व्यवस्थापक पी. व्ही. कुलकर्णी, माती परीक्षण विभागाचे माती परीक्षक शरद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.