सोलापूर [ता: 27]/ प्रमोद गोसावी
विद्यापीठातर्फे आयोजित नॅक चर्चासत्राचा एक हजार जणांनी घेतला लाभ
देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळण्यासाठी महाविद्यालय व विद्यापीठांनी नॅक मूल्यांकन करून घेणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन बंगळुरूच्या नॅकचे सल्लागार डॉ. गणेश हेगडे यांनी केले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आयक्यूएसी विभागामार्फत ‘नॅक मूल्यांकन’ (रिवायझड ॲक्रिडेशन फ्रेमवर्क ऑफ नॅक) या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन करताना डॉ. हेगडे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. आयक्यूएसी विभागाचे संचालक प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
डॉ. हेगडे यांनी नॅक मूल्यांकन प्रक्रियेशी संपूर्ण माहिती दिली. नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सध्या बदल झाले असून त्यात गुणवत्तावाढीसाठी विशेष लक्ष देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नॅक मुल्यांकन करून घेण्यासाठी सर्व प्राचार्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. नॅकचे काम हे आपल्या दैनंदिन कामाचा भाग झाला पाहिजे. आताच्या कोरोनाच्या काळात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रमांची नोंद ठेवावी. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य निरंतर पाहिजे. संशोधनासाठी सर्वांनी प्राधान्य आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.
नॅकचे सहायक सल्लागार डॉ. एन. आर. मोहन म्हणाले, नॅकच्या मूल्यांकनावेळी थर्ड पार्टीकडून पडताळणी केली जाते, त्यामुळे प्रत्येक माहिती ही जे सत्य आहे तेच सादर करणे आवश्यक आहे. सत्यता पडताळणीचे काम यावेळी होत असते. त्यामुळे खरी माहिती सर्वांनी द्यावी, असे ते यावेळी म्हणाले. नॅकचे उपसल्लागार डॉ. लीना गहाणे यांनी विद्यार्थी सर्व्हे, प्रत्यक्ष भेट व नॅक याविषयी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना मदत करा, पण त्यांच्याकडून चुकीची माहिती वदवून घेऊ नका असे सांगितले. डॉ. ए. व्ही. प्रसाद यांनीही नॅकच्या विविध गोष्टींविषयी माहिती दिली.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाले की, गुणवत्तावाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. नॅक मूल्यांकन करून घेण्यासंदर्भात विद्यापीठाकडून नेहमी संलग्न महाविद्यालयांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले जाते. याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगले उच्च शिक्षण देण्याबरोबरच कौशल्याभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्याची माहितीही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली
प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षक अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एक हजार 26 जणांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी 101 प्रश्न विचारण्यात आले. डॉ. हेगडे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. या चर्चासत्रासाठी तांत्रिक सहाय्य डॉ. एस. डी. राऊत आणि प्रा. सी. जी. गार्डी यांनी केले.