अल्पावधीत सोलापूर विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण भरारी -पालकमंत्री भरणे

सोलापूर/ ताः ३- [प्रमोद गोसावी]

       केवळ एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अल्प कालावधीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत गुणवत्तापूर्ण भरारी घेतली आहे. देशातील व विदेशातील नामांकित संस्था व विद्यापीठांशी सामंजस्य करार करून गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत नामांकित यादीत आपले स्थान निर्माण केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.
      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा वर्धापन दिन कार्यक्रम ऑनलाइन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री भरणे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विद्यापीठ, वर्धाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची विशेष उपस्थिती होती.
     प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी केले. कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी यावेळी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला. प्रारंभी सकाळी दहा वाजता विद्यापीठ प्रांगणात कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
    पालकमंत्री भरणे म्हणाले की, ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सोलापूरच्या ऐतिहासिक नगरीत तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. आज या विद्यापीठाने सोळा वर्षात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. दर्जेदार सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर या विद्यापीठाने विशेष स्थान उच्च शिक्षण क्षेत्रात निर्माण केले आहे. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती जोपासून चांगले शिक्षण घेत देशसेवेसाठी सज्ज व्हावे. विद्यापीठात भाषा, आरोग्य, कृषी पर्यटन अभ्यासक्रमाबरोबरच उजनी धरणाच्या संशोधनाचे चांगले कार्य झाल्याचे कौतुकही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी केले. त्याचा सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
     कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक करीत पुढील काळात विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी दिलीडॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने गेल्या सोळा वर्षात चांगले यश संपादन केले आहे. शिक्षणातून भविष्याची निर्मिती होते. देशाच्या प्रगतीसाठी उच्च शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे असते. वर्धापन दिन हा संकल्पाचा पुनरुच्चार करण्याचा दिवस असतो. संस्थेच्या विकासासाठी प्रगतीसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. सर्वांनी निष्ठेने, प्रामाणिकपणाने संस्थेच्या विकासासाठी योगदान देणे महत्त्वाचे असते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन म्हणाल्या की, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन शिक्षण धोरणात क्रिएटिव्हिटी करण्यासाठी मोठा वाव आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल झालेले आहेत. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर जाऊन शिक्षण देण्याची व शिक्षण घेण्याची संधी यामुळे आता निर्माण झाली आहे. विद्याशाखा बदल अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख कोर्सेस तसेच संशोधनाची भरपूर संधी मिळणार आहे .आत्मनिर्भर भारत करण्यासाठी नव्या शिक्षणाचा निश्चितच फायदा होणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ‘विद्या संपन्नता’ हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करत असलेल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी चांगले शिक्षण, संशोधन व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
    यावेळी ऑनलाईन कार्यक्रमात विद्यापीठाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले तर मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांनी आभार मानले. ऑनलाइन कार्यक्रमासाठी डॉ. एस. डी. राऊत आणि प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी तांत्रिक सहाय्य केले. 

error: Content is protected !!