जलकुंभ उभारणीचे काम तातडीने सुरु करा – आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजीतील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या सहा जलकुंभ उभारणीचे काम तातडीने सुरु करण्यासह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 300 बेडसाठी आवश्यक स्टाफ उपलब्ध करुन द्यावा तसेच एमआरआय मशिनही द्यावे. त्याचबरोबर इचलकरंजी शहरासाठी आवश्यक 30 हजार हॉर्सपॉवर वीजेची उपलब्धता करुन द्यावी आणि कबनूरातील जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ कनेक्शन देताना कोणतीही आकारणी करु नये अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले. यावेळी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी जलकुंभ संदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी विविध प्रश्‍नी सविस्तर माहिती देत त्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने नवीन 6 जलकुंभ उभारणीसाठी मंजूरी दिली आहे. परंतु त्या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुढील काहीच कार्यवाही केली जात नाही. पुढील पुर्तता करुन जलकुंभांची उभारणी करावी, अशी मागणी केली. यावेळी मजिप्राचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट हे बैठकीत उपस्थित नसल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्वपूर्ण बैठकीची सूचना देऊनही ते गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देत संबंधित कामाची पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारने प्रत्येक घरात मोफत नळ कनेक्शन देण्याचे जाहीर करत त्यासाठीचा निधीही दिला आहे. त्याचबरोबर योजना कामासाठी उकरले जाणारे रस्ते तातडीने दुरुस्त करुन देण्याचे आहे, असे असताना संबंधित मक्तेदाराकडून नळ कनेक्शनसाठी आकारणी केली जात आहे. तर रस्ते अर्धवट व अपुर्‍या स्थितीत केले जात असल्याकडे आमदार आवाडे यांनी लक्ष वेधले. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 70 हजारपेक्षा अधिक आहे त्याठिकाणी नगरपरिषद करण्याची मागणीही आमदार आवाडे यांनी केली. त्याचबरोबर वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आणि विविध उद्योगांची नगरी असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीसाठी 30 हजार हॉर्सपॉवर वीजेची आवश्यकता असून त्याबाबतही मागणी मांडली.
त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र हे रुग्णालय 300 बेडचे असून त्या मानाने येथील स्टाफ अपुरा असल्याने आवश्यक तो स्टाफ तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणीही आमदार आवाडे यांनी यावेळी केली.

error: Content is protected !!