अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालय स्थापनेसाठीचा प्रस्ताव सादर करा – धन्यकुमार गुंडे

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका)

अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी जलदगतीने सोडवण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक विभागाचे स्वतंत्र कार्यालय व जिल्हास्तरीय अधिकारी असणे आवश्यकआहे. यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनी केल्या.

जिल्ह्यातील अल्पसंख्याक नागरिकांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत श्री. गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहुजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी व महामंडळाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
श्री. गुंडे म्हणाले, अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. प्रत्येक तालुक्यांतील गावागावांत शिबिरांचे आयोजन करुन शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ अल्पसंख्याक समाजातील लाभार्थ्यांना मिळवून द्यावा.
जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील मुलांना उच्च शिक्षण, पीएच.डी तसेच परदेश शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती मिळवून देवून या समाजातील अधिकाधिक मुले उच्च शिक्षण घ्यावेत, यासाठी प्रयत्न करा. तसेच मुला मुलींच्या वसतिगृहांची संख्या वाढवा. या समाजातील महिलांनी उद्योगधंदा सुरु करण्यासाठी त्यांना सबसिडी देण्याबाबतचा प्रस्तावही सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी श्री. गुंडे यांनी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, उर्दू भाषिक शाळा, अल्पसंख्यांकांसाठीच्या शाळा, विद्यार्थी संख्या, वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांची संख्या, धार्मिक स्थळांची सद्यस्थिती आदी विविध विषयांचा आढावा घेतला.
केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
विविध विभागांच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!