सलाईनच्या नळीने गळा आवळून शासकीय रुग्णालयाती रुग्णाची आत्महत्या

अकोला / प्रतिनिधी

   अकोला शासकीय रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका करोना (corona) बाधित रुग्णाने सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर व्यक्ती कर्करोगानेही ग्रासलेला होता आणि आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर अकोला शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संग्रहित छायाचित्र

    पातुर येथील रहिवासी असलेल्या या ५७ वर्षीय रुग्णावर गेल्या काही दिवसांपासून अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मुख्य म्हणजे कोविडवर मात करण्यात या रुग्णाने यशही मिळवले होते. शनिवारी करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता व त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्याआधीच त्याने आपली जीवनयात्रा संपवली. वॉर्डातील इतर रुग्णांना संशय येवू नये म्हणून अंगावर चादर घेऊन सलाईनच्या नळीने रुग्णाने आपला गळा आवळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार काही वेळाने लक्षात येताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली. वॉर्डातील इतर रुग्णांना हा प्रकार पाहून मोठा धक्का बसला.

    रुग्णाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी कर्करोगानेही ग्रस्त असलेल्या या रुग्णाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!