हातकणंगले /ताः ६
हातकणंगले येथील तहसील कार्यालयासह अन्य कार्यालयाचे लोखंडी प्रवेशद्वार अचानक बंद करण्यात आले. नागरिकांना सकाळी दहा वाजल्यापासून बारापर्यंत कामासाठी आलेल्या नागरिकांना अक्षरशः कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला . त्यानंतर नागरिकांनी तहसीलदार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता , नायब तहसीलदार दिगंबर सानप यांच्या तोंडी आदेशावरून बंद केल्याचे सांगण्यात आले .
सध्या हातकणंगले येथील सरकारी कार्यालय दोन इमारतीमध्ये सुरू आहे . त्यातील एका इमारतीमध्ये तहसील कार्यालयाचे तर दुसऱ्या इमारतीमध्ये खरेदी-विक्री कार्यालय , सहकार विभाग , कृषी विभाग , सामाजिक वनीकरण व वन विभागाची कार्यालय आहेत . या कार्यालयामध्ये सोशल डिस्टन्स ठेवुन नागरिकांची दररोज ये- जा मोठया प्रमाणात सुरु असते . पण अचानक तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून वारंवार लोखंडी प्रवेशद्वार बंद करून नागरिकांची गैरसोय केली जात आहे . याबाबत अधिक चौकशी केली असता तहसील ऑफिस मधील वरिष्ठ लिपिकाची दुचाकी चोरीला गेल्याने वारंवार प्रवेशद्वार बंद करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला .
