पुणे/22 एप्रिल
आईला भेटायला माहेरी आलेल्या बहिणीच्या सख्या भावानेच मित्राच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील बोरगाव येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शीतल लक्ष्मण चौधरी असे मयत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेलं नाही.

शीतल लक्ष्मण चौधरी ही पुणे येथे आपल्या मुलीसह राहत होती. मात्र पाडव्यानिमित्त शीतल आईला भेटण्यासाठी केज तालुक्यातील बोरगाव येथे काही दिवसांपूर्वी मुलीसह आली होती. मंगळवारी रात्री 9 वाजता घरातील सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर मध्यरात्री 1 ते 2 च्या सुमारास भाऊ दिनकर गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांनी झोपलेल्या शीतलच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून पळून गेले. शीतलच्या आईने ओरडा-ओरड केली तेवढया वेळात दोघेही पळून गेली. डोक्यावर गंभीर जखम असल्याने शीतलचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शीतलचा चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे याने दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात दिनकर गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने बहीण भावाच्या पवित्र नात्यानं अस कोणतं कारण ठरलं की दिनूने सख्या बहिणीला संपवलं, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पथक तयार करण्यात आलं आहे.