जिल्ह्यातील मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण २३ जानेवारी पासून सुरु

*जिल्हा व तालुका स्तरावर अधिकार्‍यांची नियुक्ती

कोल्हापूर दि. 21 (जिमाका): जिल्ह्यातील मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकाच वेळी दि. २३ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी हाती घेतले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सुचनांनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर १ नोडल अधिकारी व १ सहाय्यक नोडल अधिकारी तसेच तालुकास्तरावर १२ नोडल अधिकारी व १२ सहाय्यक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष कामकाज पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार ४४ इतक्या प्रगणकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी एकूण ४०१ इतक्या सुपरवायझरची नियुक्ती केली आहे.

मराठा सर्वेक्षण संदर्भातील जिल्हास्तरावरील प्रशिक्षण दि. २० जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहामध्ये पार पडले. तर तालुकास्तरावरील प्रगणकांचे प्रशिक्षण दि. २१ व २२ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये दि. २३ जानेवारी पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होणार असून नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी सर्वेक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहेत. या भेटीच्या वेळी सर्व नागरिकांनी घरामध्ये उपस्थित राहून आपली माहिती भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यास उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!