लग्नातच झाली ३५ तोळे दागिन्यांची चोरी,१५ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास

 शिरोली येथील ए.एस. लॉनमध्ये लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांचे ३५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने. मोबाइल आणि आठ हजार रुपयांची रोकड ठेवलेली बॅग चोरट्याने लंपास केली. हा प्रकार सोमवारी (दि. १८) रात्री दहाच्या सुमारास घडला. याबाबत केतन वीरेंद्र नंदेशवन (वय ३६, रा. बेळगाव, कर्नाटक) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केतन नंदेशवन यांच्या मामेभावाच्या लग्नाचा स्वागत समारंभ सोमवारी रात्री शिरोली जकात नाक्यावरील ए.एस. लॉनमध्ये होता. त्यासाठी नंदेशवन कुटुंबीय लॉनमध्ये आले होते. केतन यांच्या आईकडे दागिन्यांची बॅग होती. त्या पायात बॅग ठेवून खुर्चीत बसल्या होत्या. रात्री दहाच्या सुमारास त्यांची नजर चुकवून एका तरुणाने बॅग लंपास केली.

    काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच नंदेशवन कुटुंबीयांनी बॅगचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर स्वागत समारंभाचे चित्रीकरण करणारे कॅमेरे तपासले असता, एका चोरट्याने बॅग लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्या बॅगेत ३५ तोळे दागिने, आठ हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाइल असा सुमारे १५ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. चोरी झाल्याचे स्पष्ट होताच केतन यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
error: Content is protected !!