गणरायाच्या स्वागतावेळी फरशीवरून पाय घसरल्याने भक्ताचा दुर्दैवी मृत्यू

गणेशाच्या स्वागतासाठीच्या गडबडीत बोलकेवाडी सचिन शिवाजी सुतार (वय ४२, रा. बोलकेवाडी) या गणेश भक्ताचा पाय घसरून पडल्याने एका काल (मंगळवार) मृत्यू झाला. आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथे ही दुर्घटना घडली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाची धामधूम सुरू असताना घरातील कर्ता मुलगा गमवावा लागल्याने सुतार कुटंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सचिन मुंबई येथे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. ते गणेशोत्सवासाठी सोमवारी (ता. १८) गावी आले होते.


गणपतीची मूर्ती आणण्यासाठी ते मित्रासोबत गेले होते. त्यांचा घरगुती गणपती मित्र घेऊन आला. मूर्ती घेऊन दोघेही घरासमोर आले. गणपतीचे स्वागत करण्यासाठी आईला बोलावण्यासाठी ते धावतच घरात निघाले. त्याचवेळी त्यांचा पाय फरशीवरून घसरल्याने ते जोरात डोक्यावर पडले.त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने आजऱ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे सारा गाव सुन्न झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, विवाहित बहीण व भाऊ असा परिवार आहे. सचिन हे पत्नी व पाच वर्षांच्या मुलाला मुंबईत ठेवून गणेशोत्सवासाठी गावी आले होते. दुसऱ्या दिवशी मुंबईला परतणार, असे ते पत्नी व मुलाला सांगून आले होते. गणेशाचे पूजन करण्याआधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे बोलकेवाडी गावात शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!