गारगोटी /ता.२९ (प्रतिनिधी)
श्री. मौनी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही टी पाटील यांची १२० वी जयंती विद्यापीठात साजरी करणेत आली. विद्यापीठाचे शासन प्रतिनिधी नंदकुमार ढेंगे यांचे हस्ते त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करणेत आले.विशेष म्हणजे हा कार्यक्रम स्व.व्ही टी पाटील यांच्या नावाच्या आकारातील बंगल्याच्या आवारात झाला.स्व. डॉ पाटील यांचे या बंगल्यात नेहमी वास्तव्य असायचे.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते आनंद चव्हाण म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि त्यागातून स्व. डॉ.व्ही टी पाटील तथा काकाजी यांनी मौनी विद्यापीठाची तसेच बिद्री साखर कारखान्याची स्थापना केली असून भुदरगड तालुक्याचा शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक विकास डॉ. पाटील यांच्यामुळेच झाला आहे, भुदरगडवासीय नेहमीच त्यांच्या ऋणात राहतील. काकाजी फक्त शिक्षणमहर्षिच नव्हे तर सहकारमहर्षि होते, आमदार होते, खासदार होते, एक निष्णात वकील होते, कवी होते,आणि विशेष म्हणजे सहृदयी माणूस होते, त्यांच्या ऋणात राहणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.यावेळी मौनी विद्यापीठाचे माजी चेअरमन भाऊसाहेब देसाई, कर्मचारी प्रतिनिधी प्रा दीपक खोत, संचालक प्राचार्य डॉ आर डी बेलेकर, प्राचार्य उदय पाटील, व्ही जे कदम, मोहन शिंदे, मुख्याध्यापिका सौ. पी आर सरदेसाई, डी एड कॉलेजचे प्राचार्य व्ही. एस. पाटील, सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते,शेवटी मुख्याध्यापक एम एस मोरुस्कर यांनी आभार मानले.

