मुंबई / प्रतिनिधी
राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे मिनी लॉकडाऊन (weekend lockdown) जाहीर करण्यात आला आहे तर दुसरीकडे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आता राज्यातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली आहे.
संग्रहित छायाचित्र
कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे 25 वर्षांपुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.
मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत, असेही या पत्रात म्हटले आहे.
मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.