गारगोटी /ता.१६-आनंद चव्हाण
गेल्या चार दिवसांत भुदरगड तालुक्यात संततधार पाऊस कोसळत असून नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. कोसळणाऱ्या पावसामुळे भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीला महापूर आला असून. महापुरामुळे गतवर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. भुदरगड तालुक्याची वरदायिनी असलेल्या वेदगंगा नदीवरील पाटगाव धरण १०० टक्के भरले आहे. गेल्या चार दिवसात भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत आहे . भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजे पाटगाव परिसरात गेल्या चोवीस तासात १७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे वेदगंगा नदीला पुन्हा पूर आला असून वेदगंगा नदीवरील गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर यासह सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत.
पाटगाव धरण १०० टक्के भरले तर कोंडोशी ,फये, मेघोली फुल्ल. अतिवृष्टीमुळे भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीवरील पाटगाव (श्री मौनीसागर जलाशय)धरण १०० टक्के भरले आहे . धरणाची पाण्याची पूर्ण संचय पातळी ६२६.६० मीटर असून आज सायंकाळी पाच वाजता धरणात ६२६.६० मीटर संचय पातळी झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा १०५.२४२ दशलक्ष घनमीटर असून आज धरणात १०५.२४२ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.
धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासांत १७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे,१ जूनपासून आजपर्यंत ४९५० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. गतवर्षी २०१९ साली आज तारखेपर्यंत ५५०४ मिलिमीटर पाऊस झाला होता.तर चिकोत्रा नदीवरील चिकोत्रा धरण ७० टक्के भरले आहे, तालुक्यातील कोंडोशी , फये तसेच मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प या अगोदरच पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु ;वेदगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटगाव धरण भरले असल्याने संध्याकाळी ५ .०० वाजता विद्युत गृह विसर्ग ३५० क्यूसेक्सने चालू केला आहे.तरी वेदगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे
