जिल्ह्यातील पहिला गृह विलगीकरणाचा वडणगे पॅटर्न यशस्वी करु -सरपंच सचिन चौगले .

कोल्हापूर /दि. 1

         सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या वडणगे ( ता. करवीर ) पॅटर्नला प्रत्यक्षात सुरुवात झाली. वडणगे ग्रामपंचातीच्या माध्यमातून या रुग्णाला किट देवून मनोबल वाढवून त्याच्याच घरी स्वतंत्रपणे गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. वडणगे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत अशा पध्दतीने उपचारासाठी मागणी केली होती. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक पाठवून मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
       गावातील एका कॉलनीत राहणाऱ्या या पेशंटला कोरोनाची बाधा झाल्यावर शिंगणापूर येथील कोव्हिड काळजी केंद्रात पाठविले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून या रुग्णाला लक्षणे नसल्याने त्यास गृह विलगीकरणात ठेवता येईल असे सांगितले. या रुग्णाच्या घरी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे . असे पत्र ग्रामपंचायतीने कोव्हिड काळजी केंद्राला दिल्यानंतर रुग्णाला घरी राहण्याची परवानगी देण्यात आली.
      रुग्णाचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामपंचायत, दक्षता समिती सदस्य यांनी रुग्णाच्या कॉलनीत जाऊन रुग्णाशी आणि नातेवाईकांशी घराबाहेरून संवाद साधला. घराच्या वरील मजल्यावर स्वतंत्र खोलीमध्ये रुग्ण राहणार आहे. तसेच कुटूंबातील दोन सदस्य खालील खोलीमध्ये रहाणार आहेत. रुग्णांने कोणती काळजी घ्यावी, सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी . याबाबत शासनाने दिलेली नियमावली त्यांना देण्यात आली.

सचिन चौगले
सरपंच

            
शासकीय प्रक्रिया पूर्ण करुन रुग्णाला गृह विलगीकरणात ठेवले आहे. वडणगे गावाने केलेल्या संकल्पाला आजपासून प्रारंभ केला आहे. ग्राम दक्षता समिती त्याचबरोबर ग्रामस्थ यांचे मोठे सहकार्य लाभले. डॉ. अभिजित गाडिवड्ड हे या रुग्णाची काळजी घेणार असून येणाऱ्या काळात हा उपक्रम यशस्वी करु.

 

प्रा. डॉ. महादेव नरके
25 हजार लोकसंख्या असणाऱ्या वडणगे सारख्या गावात पूर्ण ताकतीने हा संकल्प पुढे जातोय . ही महत्वाची गोष्ट आहे. पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख या सर्वांनी उपक्रमाला भक्कम पाठबळ दिले आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, दक्षता समितीचे सदस्य, ग्रामस्थ यांनी मोठे पाठबळ दिले आहे.

सरपंच सचिन चौगले यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे ग्रामपंचायतीमार्फत किट दिले. यामध्ये ऑक्सिमीटर, थर्मोमीटर,औषधे, ड्रायफ्रूट , पनीर , आयुर्वेदिक काढा साहित्य, वाफ घेण्यासाठी निलगिरी तेल याचा समावेश आहे .डॉ.संदिप पाटील यांनी तयार केलेले रुग्णाच्या बाबतीतील दिवसभराचे वेळापत्रक देण्यात आले. यात आहारतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली केलेला डायट प्लॅन, योगा,ध्यान,हलका व्यायाम तसेच वाफ घेण्याचा, आयुर्वेदिक काढा घेण्याच्या वेळा याचा समावेश आहे.
आवश्यक त्या सर्व सोयी आणि प्रशासनाची योग्य ती मदत व मार्गदर्शन या माध्यमातून डॉ. संदीप पाटील, तसेच गावातील वरिष्ठ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक खासगी डॉक्टर डॉ. अभिजित गाडिवड्ड हे या रुग्णाशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधून नोंदी घेणार आहेत. सोशल कनेक्ट तर्फे प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी काढा करण्याचे साहित्य, ड्रायफ्रूट, नाचणी सत्व रुग्णाला दिले. सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, राजू पोवार, महालिंग लांडगे, अमर टिटवे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश बागूल यांच्यासह कोरोना दक्षता समिती, ग्रा. पं. सदस्य, वैद्यकीय, प्रशासकीय व ग्रा. पं. कर्मचारी व ग्रामस्थ सकाळ पासुन कार्यरत आहेत.

error: Content is protected !!