सोलापूर /ता : ६
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ग्रामीण विकास आणि पर्यावरणशास्त्र विभागाकडून 7 ते 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत ‘कोविड काळामधील वातावरणातील बदल आणि ग्रामीण विकास’ या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. यामध्ये श्रीलंका, म्यानमार आणि नोएडा येथील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्रीलंका येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. रोहना पी महालीयानारचची कृषी पर्यटन, ग्रामीण विकास आणि कोरोना काळातील हवामान बदल याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता म्यानमार येथील डॉ. रवीकुमार सिन्हा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता प्रतिभावंत लेखक तथा संगणक तज्ञ डॉ. अच्युत गोडबोले अर्थकारणावर मार्गदर्शन करणार आहेत. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नोएडा येथील डॉ. भगवती प्रसाद शर्मा इंडस्ट्री, सोसायटी आणि इकॉनॉमी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याचे संयोजक सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देश-विदेशातील विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षणतज्ञ सहभागी झाले आहेत. श्रीलंका, बल्गेरिया, बांगलादेश, अल्जेरिया, झांबिया, थायलंड, अफगाणिस्थान, इजिप्त आणि फिलिपाईन्स या नऊ देशांचे प्रतिनिधी या ऑनलाइन वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. याचबरोबर महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर पासून ते इतर सर्व राज्यातील प्रतिनिधी यात सहभागी होत आहेत. विद्यापीठाकडून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यावरणशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. विनायक धुळप हे वेबिनारच्या यशस्वीतेसाठी नियोजन करीत आहेत. यु ट्यूब लिंकवर प्रसारित होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.