स्वतःची घरपट्टी-पाणीपट्टी वेळेवर भरायला नको,
राजकारण्यांच्या फंदात पडायला नको,
त्यांच्याशी वाकडं घ्यायला नको,
आणि म्हणं आम्हाला विकास पाहीजे.
राजकारणातल्या कुरघोड्या फक्त बघत राहु,
वेळीचं पाऊल उचलायला नको,
आपलं काय जात नाय, जाणारा बघुन घेईल हीच भावना लोकांच्या मनात रूजत गेली,
आणि म्हणं आम्हाला विकास पाहीजे.
खेडं विकासाचा पाया हे आम्ही विसरूनचं गेलो,
जुन्या राजकारण्यांना साथ देत गेलो,
साहेबांचा विजय म्हणतं गेलो,
साहेबांनी काय आजपर्यंत फाळा भरला नाही,
कर्मचारी लोकांनी त्यांच्या घराची पायरी चढली नाही,
मोडक्यावर मुद्दाम पाय द्यायचा ही आमची सवय काय गेली नाही,
विकासाच्या नावानं शिमगा करायची सवय आम्ही सोडली नाही…
गावं तसं चांगलं पण वेशीला टांगलं ही परंपरा कायम राहीली,
विकासाची पायरी अर्धवटचं राहीली,
गावात योजना आली, वर्षभर ती रखडली
कुणी काय केलं? आम्ही विचारलं नाही
गावच्या ग्रामसभेला आम्ही कधी गेलोचं नाही,
भाऊबंदकीची भांडणं पंचायतीत न्यायला आम्ही विसरलो नाही,
वशिल्याची आमची सवय कधीच गेली नाही,
अनुदानं तरी आलीत पण, कुणाच्या घश्यात गेली कळालीच नाही,
कुणाचं घर काँक्रीट अन् कुणाच घर मातीचं झालं हे आम्हाला उमगलचं नाही…
कारण, जन्मापासुन आम्हाला विकासाची व्याख्याचं समजली नाही…
मित्रांनो ही कविता एक टोचणी आहे जी सर्वसामान्य जनतेसाठी लिहली आहे…

कसबा तारळेकर