जयसिंगपूर /ता : ५
मागील २४ तासात धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामधील जनजीवन विस्कळीत होत आहे . सततच्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असून पडणारा पाऊस असाच वाढत राहिला तर धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जाईल . नद्यांच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ झाल्यास महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे . ज्यांना शक्य आहे . त्यांनी तातडीने स्थलांतरित व्हावे . असे आवाहन नाम .राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे . महापुरामध्ये बुडणाऱ्या अथवा वाहून जाणाऱ्या विद्युत मोटारी तसेच शेतीपंपांची तातडीने खबरदारी घ्यावी . नदीकाठच्या शेततळावर अथवा नदीचे पाणी जिथे येऊ शकते . अशा ठिकाणी असलेली सर्व जनावरे सुरक्षितस्थळी हलवावीत, घरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी . असेही मंत्री यड्रावकर यांनी म्हंटले आहे
सततच्या पावसाविषयी बोलताना यड्रावकर यांनी सांगितले, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी, वारणा आणि कोयना या प्रमुख धरणांच्या धरणक्षेत्रात सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवतो . शासनाचा आपत्ती विभाग व प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सुद्धा गत वेळचा अनुभव घेऊन काळजी घ्यावी .