बारा बोअरच्या बंदूकीसह तरुण अटक

कोल्हापूर : दहशत माजविण्यासाठी बारा बोअरची बंदूक जवळ बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. शनिवारी दुपारी नवीन वाशी नाका येथील कनेरकरनगर चौकात ही कारवाई केली. या प्रकरणी राहूल मोहन सुतार (वय ३४ रा. राजोपाध्येनगर, सानेगुरुजी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून बारा बोअरची बंदूक, १ काडतुस, मोपेड असा सुमारे ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, कनेरकरनगर येथे एक तरुण बारा बोअरच्या बंदूकीसह येणार असल्याची माहितीं स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती. यानुसार शनिवारी दुपारी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. यावेळी एक तरुण विना नंबर प्लेटच्या मोपेडवरुन आला. त्याला थांबवून अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ बारा बोअरची बंदूक, १ काडतुस मिळून आले. पोलिसांनी त्याला अटक करुन जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, बालाजी पाटील, अमित मर्दाने यांनी ही कारवाई केली.

error: Content is protected !!