अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अझर इकबाल मुजावर (वय ३५ रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) याला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार तीन वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी ही शिक्षा सुनावली. यासाठी सरकारी वकील उदय कुलकर्णी यांनी काम पाहिले.
कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावातील अल्पवयीन मुलगी २७ ऑगस्ट २०१६ ला क्लासवरून घरी जात होती, त्यावेळी अझर मुजावर याने तिला आडवून आपल्या मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी जयसिंगपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीत, कुरुंदवाड पोलिसांनी सादर केलेले साक्षी पुरावे आणि सरकारी वकील अॅड. कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद या आधारावर अझर मुजावरला न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली.